झेडपी सीईओंचे शिक्षकांना पत्र; पटसंख्या वाढविण्याचा दिला मंत्र
By संतोष वानखडे | Published: April 16, 2024 04:10 PM2024-04-16T16:10:02+5:302024-04-16T16:10:24+5:30
उन्हाळी सुटीत गुरूजींना दिला गृहपाठ : शाळा सुरू झाल्यानंतर सीईओंकडून होणार उजळणी
वाशिम : जिल्हा परिषद शाळांचा भौतिक व शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वैभ वाघमारे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षकांना सविस्तर पत्र लिहिले. त्यानुसार पटसंख्या वाढविण्याबरोबरच उन्हाळी सुटीत शिक्षकांना अध्ययन निष्पत्ती व पाठ्यक्रमांचे सखोल अध्ययन करावे लागणार आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ७७९ प्राथमिक शाळा आहेत. मात्र, काही शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या आहे. अनेक जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक दर्जा खालावत असल्याने जिल्हा परिषद शाळेऐवजी खासगी शाळेत पाल्याचा प्रवेश घेण्याला ग्रामीण भागातील पालकही पसंती देत असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याबरोबरच शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी उन्हाळी सुट्टीत शिक्षकांसाठी कृती आराखडा तयार केला.
सर्व शिक्षकांना पत्र पाठवून आगामी शैक्षणिक सत्रासाठी अध्ययन निष्पत्ती व पाठ्यक्रमांचे सखोल अध्ययन करण्याच्या सूचनाही दिल्या. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर, सीईओ हे रँडमली कोणत्याही शिक्षकाची निवड करून त्यांना बोलावतील. पाठ्यक्रमातील व अध्ययन निष्पतीतील सर्व बाबी येतात की नाही हे तपासणार असल्याने शिक्षकांना गृहपाठ करावा लागणार आहे. गृहपाठ कच्चा असणाऱ्या शिक्षकाची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असा इशाराही सीईओ वाघमारे यांनी दिला.
कोणती तीन उल्लेखनीय कामे करावी लागणार?
- ज्या शिक्षकांचा पट ३० पेक्षा कमी आहे, त्यांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये किमान ३० पेक्षा अधिक पटसंख्या कशी होईल याचे काटेकोर नियोजन करावे.
- मुलांचा कल मोफत झेडपीच्या शिक्षणापासून, खाजगी शाळांकडे जाण्यामागे मुख्य कारण म्हणजे अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये शिक्षक कमी पडत आहेत. त्यामुळे दर्जेदार शिक्षण देण्याकरिता अध्ययन निष्पत्तीच्या मजकुराच्या अनुषंगाने जि.प. शाळेच्या प्रत्येक भिंती बोलक्या कराव्या.
- उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने मजकूर उपलब्ध करून दिला जाईल. अध्ययन निष्पत्तीच्या संबंधित मजकुराचा तसेच पाठ्यक्रमांचा सखोल अभ्यास करावा. सुट्ट्या संपल्यानंतर या गृहपाठाची उजळणी घेतली जाईल.