जि. प. निवडणूक : सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:44 PM2019-12-23T13:44:26+5:302019-12-23T13:44:54+5:30

निवडणूक सोबत लढण्यासंबंधी काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे अद्याप काहीच निश्चित झालेले नाही.

ZP Election: Self-preparation of all parties | जि. प. निवडणूक : सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी

जि. प. निवडणूक : सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी

googlenewsNext

- सुनील काकडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ एक दिवस शिल्लक असून, ही निवडणूक सोबत लढण्यासंबंधी काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे अद्याप काहीच निश्चित झालेले नाही. तीनही पक्षांनी स्वतंत्ररित्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीकडूनही इच्छुकांची चाचपणी करण्यात आली आहे. यामुळे शेवटच्या दिवशी, सोमवारी सर्वच पक्षांमधील इच्छूक उमेदवार स्वतंत्ररित्या नामांकन सादर करतील, असे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ५२ गटांकरिता आणि त्याअंतर्गत असलेलया सहा पंचायत समितींच्या १०४ गणांसाठी येत्या ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक होऊ घातली आहे. विविध प्रवर्गांसाठी असलेले राजकीय आरक्षण तुर्तास ‘जैसे थे’ ठेऊन निवडणुका ठरल्यानुसारच घेण्यात याव्या, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १८ डिसेंबरपासून प्रशासनाने निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र स्विकारण्याच्या प्रक्रियेसही सुरूवात केली. २१ डिसेंबर या उमेदवारी दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेच्या ५२ गटांकरिता ४३ व्यक्तींनी ५०; तर पंचायत समितीच्या १०४ गणांकरिता ४५ व्यक्तींनी ५२ अर्ज दाखल केले.
दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आलेल्या काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेना हे तीन पक्ष याच फॉर्म्यूल्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडूकीलाही सामोरे जातील, असा राजकीय जाणकारांचा कयास होता; मात्र यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे तीनही पक्षांनी स्वतंत्ररित्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीकडूनही आपापल्या स्तरावर इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, त्याच इच्छुकांपैकी काहीजण ठराविक त्या-त्या पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात सोमवार, २३ डिसेंबरला नामांकन सादर करतील. यायोगे सर्वच राजकीय पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

प्रदिर्घ बैठक होऊनही महाविकास आघाडीचा निर्णय अधांतरीच

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस केवळ एक दिवस शिल्लक आहे. दरम्यान, आतापर्यंत स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी रविवारी मात्र एकत्र बसले; परंतु तीन तासांपेक्षा अधिक चाललेल्या या बैठकीत महाविकास आघाडीने एकत्र लढण्यासंबंधी एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे याबाबत सोमवारी सकाळी पुन्हा तीनही पक्षांची पुन्हा बैठक होऊन त्यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक यांनी दिली. याच बैठकीत उपस्थित असलेल्या शिवसेनेतील एका जबाबदार पदाधिकाºयाने मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणे जवळपास अशक्य असल्याचा गौप्यस्फोट केला. असो काही; मात्र तुर्तास तरी आगामी जि.प. व पं.स. निवडणूक सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत मिळत असल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.

Web Title: ZP Election: Self-preparation of all parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.