जि.प. अधिकारी, कर्मचाऱ्यांनो, कोरोना चाचणी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:23+5:302021-03-15T04:37:23+5:30
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त नागरिकांची वर्दळ असते. कोरोना काळातही जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत गर्दी ...
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त नागरिकांची वर्दळ असते. कोरोना काळातही जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती वर्तविण्यात येत होती. दरम्यान गेल्या, १२ दिवसांत जिल्हा परिषदेत जवळपास १९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने प्रशासनही हादरले. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी, अशा सूचना जि.प. अध्यक्ष डॉ. शाम गाभणे यांनी दिल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनीदेखील चाचणी करावी. ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे, कोरोनाविषयक नियमांचे पालन करून जिल्हा परिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. गाभणे यांनी केले. तसेच कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांनी सरकारी संस्थात्मक विलगीकरणात राहावे, डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमित वेळेवर घ्यावी आणि सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जि. प. अध्यक्ष डॉ. गाभणे यांनी केले.