जि.प. शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक दोन महिन्यांपासून ‘पेन्शन’विना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:50 AM2020-05-04T10:50:05+5:302020-05-04T10:50:14+5:30
‘पेन्शन’ मिळाले नसल्याने ‘लॉकडाऊन’च्या काळात सेवानिवृत्त शिक्षक व त्यांचे कुटूंब आर्थिक टंचाईमुळे हैराण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षकांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे ‘पेन्शन’ मिळाले नसल्याने ‘लॉकडाऊन’च्या काळात सेवानिवृत्त शिक्षक व त्यांचे कुटूंब आर्थिक टंचाईमुळे हैराण झाले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यभरात धुमाकूळ घातला असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी २५ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी, गेल्या ३९ दिवसांपासून सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहे. अशातच शासनाकडून जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पेन्शन देण्यात आलेले नाही. यामुळे विशेषत: पेन्शनच्या रकमेवरच विसंबून असलेल्या वृद्धांची व त्यांच्या कुटूंबियांची परवड होत आहे.
‘लॉकडाऊन’च्या काळात दुकानदारांनी किराणा माल उधारीत देणे बंद केल्याने सेवानिवृत्त शिक्षकांवर उपाासमारीची वेळ ओढवली आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांना तत्काळ पेन्शनची रक्कम द्यावी, अशी मागणी होत आहे.
गत दोन महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळाली नाही. यामुळे विशेषत: वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन लवकरात लवकर सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन द्यावी.
- सुधाकर दिक्षित
सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक