जि.प. शाळेचे प्रवेशद्वार अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:34+5:302021-09-17T04:49:34+5:30
भर जहागीर : येथून जवळच असलेल्या बोरखेडी येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रवेशद्वार अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. यासह शाळेसमोरच घाण ...
भर जहागीर : येथून जवळच असलेल्या बोरखेडी येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रवेशद्वार अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. यासह शाळेसमोरच घाण साचली असून याकडे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
बोरखेडी येथे मुख्य रस्त्यावर बारमाही गटार साचलेले असते. विशेष गंभीर बाब म्हणजे जिल्हा परिषद शाळेलाही उकिरड्याचा विळखा बसला असून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याच्या सूचना देऊनही शाळेचे मुख्य प्रवेशद्वार आजही बंदच दिसते. कधीकाळी बोरखेडी जि.प. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची जवाहर नवोदयमध्ये शिक्षणासाठी निवड होत असे. शाळेतील शिक्षकांचे त्यात महत्त्वपूर्ण योगदान असायचे. शाळेचा परिसरही सदोदित स्वच्छ राखला जायचा. कोरोनामुळे मात्र चित्र पूर्णत: बदलले असून ही शाळा घाणीच्या विळख्यात अडकली आहे.
................
कोट :
शाळेचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याचा प्रकार फार पूर्वीचा आहे. आम्ही अनेकदा प्रवेशद्वार मोकळे केले; परंतु परत अतिक्रमण होत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीलादेखील अवगत केले आहे. गावातील सांडपाणी शाळेसमोर येत असल्याचे कळविले आहे; मात्र अद्याप ही समस्या निकाली काढण्यासंबंधी कार्यवाही झालेली नाही.
- सुमित्रा कुरळकर
मुख्याध्यापक, जि.प. शाळा, बोरखेडी