जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळतेय शिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:43 AM2020-09-20T11:43:06+5:302020-09-20T11:43:35+5:30
मोबाईल, संगणकाची सुविधा नसणारे विद्यार्थी याचा लाभ घेत असल्याचे चित्र कार्ली परिसरात दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कार्ली ( वाशिम ): कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना गटा-गटाने शिकविले जात आहे. मोबाईल, संगणकाची सुविधा नसणारे विद्यार्थी याचा लाभ घेत असल्याचे चित्र कार्ली परिसरात दिसून येते.
यंदा मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळाही बंद आहेत. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण जास्त संख्येने आढळून येत असल्याने वर्ग नेमके केव्हा सुरू होतील, याबाबत अद्याप कोणतीही निश्चितता नाही. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. परंतू, ग्रामीण भागातील विशेषत: जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईल, संगणक नसल्याने या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. आॅनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नसणाºया विद्यार्थ्यांना समुदाय पद्धतीने गावातील शाळा परिसर, समाजमंदिर, मोकळी जागा येथे शिकवावे, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कार्ली परिसरात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून आठ, दहा विद्यार्थ्यांचे गट करून विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे.