शिक्षकांच्या उपस्थितीबाबत जि.प.च्या मार्गदर्शक सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 12:05 PM2021-06-20T12:05:11+5:302021-06-20T12:05:19+5:30
Washim ZP News : वाशिम जि. प. शिक्षण विभागानेही शिक्षकांच्या उपस्थितीबाबत १७ जूनरोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कोरोना काळात शैक्षणिक कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून चालू शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शिक्षकांसाठीशाळा सुरू होणार आहेत. या सत्रात कोणत्या वर्गाच्या किती शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, याबाबत शिक्षण विभागाने १४ जूनरोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर वाशिम जि. प. शिक्षण विभागानेही शिक्षकांच्या उपस्थितीबाबत १७ जूनरोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांना तसे पत्रही दिले आहे.
वाशिमसह विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २७ जूनपर्यंत उन्हाळी सुटी जारी केली आहे. त्यानुसार शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू होणार आहे. या सत्रात विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्गात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणार नसली, तरी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, दहावी व बारावीच्या निकालाकरिता मूल्यांकन करणे आदी कामांसाठी शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. कोणत्या वर्गाच्या किती शिक्षकांनी उपस्थित राहावे, याबाबत १४ जूनरोजी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानंतर जि. प. माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने वाशिम जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांच्या उपस्थितीबाबत १७ जूनला पत्र काढण्यात आले असून, कोविड-१९ परिस्थितीमुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद असल्या, तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत सुरू राहील, याची दक्षता सर्व शाळा प्रशासनाने घ्यावी, अशा सूचनाही शाळांना दिल्या आहेत.
असे असेल शिक्षक, शिक्षकेतरांच्या उपस्थितीचे प्रमाण
इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे ५० टक्के, तर दहावी व बारावीच्या १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असेल.
शिक्षकेतरांची उपस्थिती १०० टक्के अनिवार्य असेल.
प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असेल,