वीजबिल न भरल्याने दापचरी दुग्ध प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित; ६५ लाखांची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:51 PM2021-02-24T23:51:08+5:302021-02-24T23:51:44+5:30
६५ लाखांची थकबाकी : प्रकल्प अधिकाऱ्याचा मुंबईतून कारभार
तलासरी : दापचरी दुग्ध प्रकल्पासहित कुर्झे धरणाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने ४८ तासांपासून संपूर्ण प्रकल्प अंधारात गेला आहे. दुग्ध प्रकल्पाला महावितरणकडून विद्युत पुरवठा करण्यात येत असून वीजपुरवठ्याचे ६५ लाख २९ हजार १८० प्रकल्पाची विद्युत थकबाकी असल्याने मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.
दापचारी दुग्ध प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी असलेले नथू राठोड हे सध्या मुंबईत बसून दापचारी प्रकल्पाचा कारभार हाकतात. त्यामुळे प्रकल्पात सावळागोंधळ आहे. प्रकल्पाची वीज थकबाकी भरा, असे वीज कंपनीचे अधिकारी यादव इंगळे यांनी २८ जानेवारी रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगितले, पण ते गंभीरतेने प्रकल्प अधिकाऱ्यांनी न घेतल्याने कृषिक्षेत्रधारकांना ४८ तासांपासून विजेअभावी काढावे लागत आहेत. प्रकल्प कर्मचाऱ्यांनी वीजबिलाचे बिडिंग केले, पण प्रकल्प अधिकारी राठोड यांनी त्यावर सही न केल्याने थकबाकीअभावी वीजपुरवठा प्रकल्पाचा झाला. याबाबत स्थानिक कृषिक्षेत्रधारक, प्रकल्प वसाहतमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दापचरी दुग्ध प्रकल्पातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते, मात्र मंत्री पाहणी दौरा करून गेल्यानंतर ही दुग्ध प्रकल्पाची वाताहत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे होताना दिसून येत आहे.
दापचरी दुग्ध प्रकल्प आशिया खंडातील एक नंबरचा आणि स्वतःचे धरण असलेला दुग्ध प्रकल्प आहे. शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे डबघाईत गेला असला तरी सध्या ही कृषिक्षेत्रधारकांकडून दुग्ध प्रकल्पात दुग्ध उत्पादन करून देण्यात येत आहे. गेल्या आठ महिन्यापासून कृषिक्षेत्रधारकांनी भरलेल्या दुधाचे पैसे प्रकल्पाकडून अजून कृषिक्षेत्रधारकांना मिळालेले नाही. तसेच कृषिक्षेत्रधारकांना वीज, पाणी, गाईसाठी चारा मिळणार नसेल तर कृषिक्षेत्रधारकांनी थकबाकी भरायची तरी कशी? असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
धरण असलेल्या प्रकल्पाची वीज महावितरणकडून थकबाकीअभावी खंडित केल्याने धरणक्षेत्रात काळोख पसरला आहे. वीजच नसल्याने धरणासह कृषिक्षेत्र, दुग्ध प्रकल्पाला धोका निर्माण झाला आहे.