खामगाव : पारधी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचे द्वार खुले व्हावे यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सजनपूरी भागात भय्यूजी महाराजांनी निवासी आश्रमशाळा सुरु केली. त्यांच्या अचानक जाण्याने आश्रमशाळेतील मुलांनाच नव्हेतर इथे काम करणा-या शिक्षक वर्गालाही धक्का बसला असून आमचा ‘पालनहार’ हरवला असल्याचे सांगत एका शिक्षकाला रडू कोसळले. खामगाव आले की मुलांना भेटल्याशिवाय ते जात नव्हते. आश्रमशाळेच्या स्थापनेपासूनच महाराजांसोबत राहिलो. पारध्यांच्या मुलांविषयीची त्यांची तळमळ पाहून आम्हालाही अधिक काम करण्याचा हुरूप यायचा. त्यांच्या जाण्याने पारध्याची पोरं आता पोरकी झाली आहेत. त्यांचे काय होईल याचीच चिंता सतावत आहे, असे आश्रमशाळेचे शिक्षक गोवर्धन टिकार यांनी सांगितले.