कोल्हा पूर - आरे (ता. करवीर) येथे महापुरात नुकसान झालेल्या लोकांना अत्यंत सुत्रबद्धरित्या मदतीचे वाटप सुरू आहे. त्या गावांत मदत घेवून जाणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून त्याबद्दल कौतुक व्यक्त होत आहे. पूरग्रस्त अनेक गावांमध्ये आलेल्या मदतीवरून मारामाऱ्या सुरू झाल्या आहेत. मदतीची पळवापळवी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या गावाचे वेगळेपण उठून दिसणारे आहे. यापुढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपातील मदत पाठवू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. ज्या गावांना अजूनही मदत मिळालेली नाही, त्यांना ही मदत पाठवली जावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आरे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव तुळशी व भोगावती नदीच्या काठावर वसले आहे. कोल्हापूरपासून पश्चिमेला 22 किलोमीटरवर हे गाव येते. गावाला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक टायर ट्रॅक्टर व बुलडोझर असणारे हे गाव आहे. (विश्वास पाटील )