अणुस्कुरा परिसरात टस्कर हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 02:35 PM2018-11-27T14:35:14+5:302018-11-27T14:37:06+5:30
शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या टस्कर हत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. हा हत्ती आता दिवसा-ढवळ्या रस्त्यावरून बिनधास्त वावरत आहे.
अणुस्करा : शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या टस्कर हत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. हा हत्ती आता दिवसा-ढवळ्या रस्त्यावरून बिनधास्त वावरत आहे. त्यामुळे या परिसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेली चार-पाच दिवस हत्ती त्या परिसरात वावर असूनही वनविभागाकडून मात्र फारशी दक्षता घेतलेली नाही. त्यामुळे लोकांत नाराजी व्यक्त होत आहे.मोसम, मांजरे भागात दोन-तीन दिवस हत्तीने मुक्काम केल्यानंतर भरदिवसा कानसा नदी ओलांडून अणुस्कुरा गावच्या हद्दीत दाखल झाला. मनोहर पाटील यांच्या शेतात लावलेल्या बैलगाडीचा टस्कराने चक्काचूर केला तसेच त्यांच्या उसाचेही नुकसान केले आहे. आडसाली लागण केलेल्या पिकात हे जनावर बिनधास्त घुसून त्याचा फडशा पाडत आहे. विकास पाटील यांच्या शेतातील घरासमोर लावलेली मोटारसायकल सोंडेने धरून भिरकावून दिली. ट्रकच्या रिकाम्या टायरी उचलून शेतात टाकल्या. शेतीला पाणीपुरवठा करणाºया पाईप अनेक ठिकाणी उपसून टाकल्या आहेत. पाण्याच्या टाकीत सुळे घुसवून नुकसान केले. संतोष पाटील यांच्या शेडचे व उसाचे नुकसान केले.