कोल्हापूर - भूतलवाडी पैकी बुवाचीवाडी (ता. गगनबावडा) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या गव्यांच्या कळपाला वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. चौवीस तासांपेक्षा जास्त काळ गव्यांना पाण्यात काढावे लागले. बुवाचीवाडी येथील विठ्ठल भूतल यांच्या शेतामध्ये विहीर आहे. या विहिरीवर शनिवारी मध्यरात्री गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी आला होता. यावेळी अचानकपणे पाच गवे विहिरीत कोसळले. विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मातीचा गाळ असल्याने त्यामध्ये हे पाच गवे रुतून बसले होते. शिवाय विहिरीचा भाग आतपर्यंत खोल असल्याने या गव्यांची विहिरीबाहेर येण्याची केविलवाणी धडपड सुरू होती. गव्यांचे वजनदेखील अधिक असल्याने त्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. दुस-या दिवशी सकाळी याठिकाणी जेसीबी मागवून विहिरीचा काही भाग काढून गव्यांना बाहेर येण्यासाठी वाट करण्यात आली. यानंतर हे पाचही गवे विहिरीबाहेर आले.