मनोरा आमदार निवास : आमदारांना पर्यायी व्यवस्था करुन द्या - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 01:43 PM2017-07-31T13:43:03+5:302017-07-31T13:45:40+5:30
विधानसभेमध्ये विरोक्ष पक्षातील नेत्यांनी दक्षिण मुंबईतील मनोरा आमदार निवासाचा मुद्दा मांडला. मनोरा आमदार निवासातील सुरक्षेच्या मुद्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाले होते.
मुंबई, दि. 31 - विधानसभेमध्ये विरोक्ष पक्षातील नेत्यांनी दक्षिण मुंबईतील मनोरा आमदार निवासाचा मुद्दा मांडला. मनोरा आमदार निवासातील सुरक्षेच्या मुद्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाले होते. सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मनोरा आमदार निवासातील 12 व्या मजल्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील खोलीतील छत कोसळले. याप्रकरणी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोसळलेल्या छताचा तुकडा सोमवारी (31 जुलै) सभागृहात आणला व आमदारांना पर्यायी व्यवस्था करुन देण्याची मागणी केली. काय आहे नेमके प्रकरण?मुंबईतील मनोरा आमदार निवासमध्ये एका खोलीचे छत कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतील छत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सतीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सतीश पाटील हे मनोरा आमदार निवासातील खोली क्रमांक 112 मध्ये राहतात. अँटी चेंबरमधील पीओपीसहित छत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दक्षिण मुंबईत विधान भवन परिसरात मनोरा आमदार निवास आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी मनोर आमदार निवास बांधण्यात आले आहे. वर्षाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनोरा आमदार निवासाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. या पाहणीतही इमारती केव्हाही धोकादायक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेमुळे मनोरा आमदार निवासाच्या दुरूस्तीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. नरिमन पॉईंट परिसरात मनोरा आमदार निवासाच्या चार इमारती 1996 साली बांधून पूर्ण झाल्या. अवघ्या 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतींचे अंतर्गत बांधकाम सध्या खराब झाले आहे. सदनिकांमधील छताचे प्लॅस्टर कोसळत असून काही ठिकाणी भिंतींचे आवरण उखडले गेले आहे. गेली दोन वर्षे सातत्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आमदारांकडूनही तक्रारी करण्यात येत आहेत.