नाशकात ढोलवादनाच्या विश्वविक्रमाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 09:13 PM2017-08-02T21:13:28+5:302017-08-02T21:14:34+5:30
बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिकचे शिवराय वाद्य पथक सज्ज झाले असतानाच पथकाने यंदा ५१ श्लोक, ५१ कला आणि ५१ ताल ही ...
बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिकचे शिवराय वाद्य पथक सज्ज झाले असतानाच पथकाने यंदा ५१ श्लोक, ५१ कला आणि ५१ ताल ही संकल्पना घेत एका अनोख्या विश्वविक्रमाची तयारी चालविली आहे. येत्या 6 ऑगस्टला नाशिक येथे ३०० वादक आणि कलाकार विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी सध्या जोरदार सराव करत आहेत. नाशिक आणि ढोल पथक हे एक समीकरण बनले आहे. नाशिक ढोलची तर जगभर कीर्ती जाऊन पोहोचली आहे. तीन वर्षांपूर्वी शौनक गायधनी, अमी छेडा आणि तुषार भागवत या युवकांनी शिवराय वाद्य पथकाची मुहूर्तमेढ रोवली. ढोल पथकाच्या माध्यमातून आपली परंपरा, संस्कृती जोपासणारे उपक्रम सुरू झाले. दोन वर्षांपूर्वी कुंभमेळा पर्वणीकाळात या ढोल पथकाची तर संत-महंतांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. स्पर्धेच्या युगात मागे पडत चाललेल्या आपल्या कला-संस्कृतीची नव्या पिढीला, समाजाला आठवण करून द्यावी, यासाठी यंदा शिवराय वाद्य पथकाने एक अनोखी संकल्पना साकार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५१ कलाकार एकाचवेळी ५१ कलांचे सादरीकरण करणार असून, या ढोलवादनात ५१ श्लोक ताल व लयबद्ध सादर केले जाणार आहेत.