नाशिक - जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून गंगापूरसह अनेक धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी 3 हजार 214 क्युसेक विसर्ग करण्यात आला असून गोदावरी नदीला पूर आला आहे. आज सकाळी रामकुंडजवळ उत्तर प्रदेशातील पर्यटकांनी उभी केलेली रिकामी खासगी बस नदी पत्रात वाहून गेली. मात्र अग्निशामक दलाने ती क्रेनच्या मदतीने बाहेर काढली. महापालिकेने नदी काठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बरोबरच निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 24 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आज त्याच प्रमाणे दारणा धरणातून 6 हजार 610 पालखेड धरणातून 3400, कडवा धरणातून 2658 आणि आळंदी धरणातून 2716 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.