- अझहर शेखनाशिक - शहरामधील गोदाकाठालगत वाढलेल्या निलगीरीच्या वृक्षराजीवर लांब अंतरापर्यंत भरारी घेणारा नैसर्गिक जैवविविधतेमधील एकमेव सस्तन प्राणी वटवाघळांची वस्ती चांगलीच वाढत आहे. मात्र त्यांच्या हा अधिवास पुढे किती दिवस अस्तित्वात असेल याबाबत शंकाच आहे; कारण या वृक्षराजीचे बुंधे जमिनीपासून जाळण्याचा प्रयत्नही काही दिवसांपुर्वी करण्यात आला. याकडे अद्याप महापालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. हा गोदापार्कचा परिसर निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत आला आहे. दररोज संध्यााकळी या ठिकाणी फोटोसेशन करण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. सुर्यास्तावेळी गोदापात्रात पडणारे सुर्यकिरणे आणि चमचम करणारे नदीपात्राचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार या भागात येतात. तसेच हिरव्या वृक्षराजीच्या परिसरात दिवसभर छायाचित्रकार, पक्षी निरिक्षकांची वर्दळ सुरूच असते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपला जावा आणि जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, अशीच माफक अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.