अझहर शेखनाशिक : पक्ष्यांच्या अंडींमधून कृत्रिमरित्या पिल्लं बाहेर येण्याच्या घटना कानावर येतात; मात्र सर्पांच्या अंडींमधून कृत्रिम तपमानातून पिल्लं जन्माला येणे तसे दुर्मीळच. कारण बदलते वातावरण आणि ६५ दिवसांचा लागणारा कालावधी हे मोठे आव्हान याबाबत असते. तसचे सर्पांच्या प्रजातींमध्ये अजगर हा एकमेव सर्प असा आहे की, त्याची मादी स्वत:हून नैसर्गिकरित्या अंडींमधून पिल्लांना जन्म देते. धुळ्यामधील शिरपुर तालुक्यातील वन्यजीव संस्था व वनविभागाच्या अतिदक्षतेमुळे अजगराच्या सात अंडींमधून पिल्लांचा कृत्रिम तपमानातून जागतिक सर्पदिनी गेल्या सोमवारी (दि.१६) जन्म झाल्याची घटना घडली असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे. यासाठी दोन महिने नेचर कॉन्झर्वेशन फोरमचे वन्यजीवप्रेमी अभिजीत पाटील, राहुल कुंभार यांनी परिश्रम घेत शास्त्रीय अभ्यासानुसार प्रयत्न केले. त्यांना वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. ही नाशिक विभागासह संपूर्ण राज्यातील पहिलीच यशस्वी घटना असावी, असा दावा संबंधितांनी केला आहे.