नाशिक : गुटखा, पानाच्या पिचक-यांनी बरबटलेल्या भिंती, सांडपाण्याचे नाले, खाद्यपदार्थाचे ठिकठिकाणी पडलेले रॅपर, जुनी रंग उडालेली इमारत आणि सर्वत्र दुर्गंधी नाशिक मध्यवर्ती बसस्थानकाचे हे चित्र होते. आता मात्र हे स्थानक एखाद्या कलादालनासारखे भासत आहे. हँड फाउंडेशनने या बसस्थानकाचा पूर्णपणे कायापालट केला असून संपूर्ण स्थानक कॅलिग्राफीने रंगून गेले आहे. राज्यातील पहिलाच प्रयोग असून नाशिकच्या कलावंतांनी चित्रतून नाशिकप्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे. ‘आय लव्ह नाशिक’ या उपक्रमांतर्गत नाशिकमधील इंटेरिअर डिझाइनर, फोटोग्राफर्स, फाईन आर्ट आर्टिस्ट तसेच कलाक्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला हात दिला आहे.