राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर मंगळवारी 'इडी'तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. याचा निषेध म्हणून पुण्यात राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन केले.राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल नाबार्डने दिल्यावर सुरेंद्र अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यात शरद पवार यांचाही समावेश झाल्याचे समजते. याच विषयावर मंडईतील टिळक पुतळ्याजवळ राष्ट्रवादीने आंदोलन केले. या आंदोलनात 'नरेंद्र-देवेंद्र चोर है' अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र त्यानंतर अचानक कार्यकर्त्यांनी जवळ असणाऱ्या महात्मा फुले मंडई पोलीस चौकीवर चढून घोषणा दिल्या.