पुणे - ज्येष्ठ समाजवादी नेते व मानवतेची मूल्ये जतन करणाऱ्या भाई वैद्य यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अस्वस्थ झालो. भाईंनी लोकशाही मूल्ये जतन करण्याचे व्रत अंगिकारले होते. गोरगरिबांच्या हक्कासाठी सतत रस्त्यावर येऊन लढा उभा करणारे भाई पुणेकरांचे श्रद्धास्थान होते. स्वातंत्र सैनिक, गोवा मुक्ती आंदोलनातील नेता शिक्षण हक्कासाठी सत्याग्रह करणारा पुणेकरांचा मित्र आज आपल्यातून नाहीसा झाला आहे. महापौर या नात्याने त्यांनी पुणे शहराचा नावलौकिक सर्वदूर पोहचवला. राज्याचे गृहमंत्री या नात्याने त्यांची कामगिरी महाराष्ट्रातील जनतेच्या सदैव स्मरणात राहील. मराठवाडा विद्यापिठाचे नामांतर, पोलीस दलाचा बदललेला पोशाख, सेवानिवृत्तांना त्यांनी मिळवून दिलेला आर्थिक लाभ महाराष्ट्रातील जनता कधीच विसणार नाही. अशा शब्दात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भाई वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली. (व्हिडिओ - नेहा सराफ)