वाशिम - भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त २९ मार्च रोजी वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. महावीर जयंतीचे औचित्य साधून रिसोड शहरात गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मिरवणुकीला सुरूवात झाली. या मिरवणुकीत शेकडो समाजबांधवांची उपस्थिती होती. यावेळी दांडिया नृत्यही सादर करण्यात आले. मंगरूळपीर, मालेगाव येथेही सकाळी मिरवणूक काढण्यात आली. वाशिम शहरातून समाजबांधवांनी भव्य शोभायात्रा काढली. कारंजा येथे श्री १००८ भगवान महावीर जयंती महोत्सव २०१८ व सकल जैन समाज बांधवाच्यावतीने सकाळी ६ वाजता प्रभाफेरी काढली. स्थानिक किर्तीस्तंभ येथून सुरूवात झाली आणि ८ .३० वाजता ध्वजबंदन पार पडले. सकाळी ९ वाजता जन्माभिषेक सोहळा पार पडला तसेच मोटारसायकल रॅली काढण्यात आली.