वाशिम : योगगुरू, स्वामी रामदेव बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम येथे २७ फेब्रुवारीपासून तीन दिवशीय नि:शुल्क योग चिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेपासूनच कार्यक्रम असलेला रस्ता शेकडो नागरिकांनी फुलून गेला आहे. २७, २८ फेबु्रवारी व १ मार्च रोजी दररोज पहाटे ५ ते ७.३० या वेळेत योगभूमि दिघे फार्म पुसदनाका वाशिम येथे योग शिबिर पार पडणार आहे. आज प्रथम दिवशी रस्त्यावरुन योगा करण्याकरीता जाणा-यांची संख्या मोठया प्रमाणात दिसून आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनातर्फे शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केलेला दिसून आला. अतिशय शांत वातावरणात शेकडो नागरिकांनी योग शिबिरात सहभाग दर्शविलेला दिसून आला. विविध योगाचे प्रात्यक्षिक व त्याबाबत माहिती यावेळी रामदेव बाबा यांनी नागरिकांना दिली.