एसटी संपाच्या 47 दिवसांत वणी आगाराला दीड कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 05:00 AM2021-12-19T05:00:00+5:302021-12-19T05:00:16+5:30
या काळात दररोज वणी आगाराला किमान पाच लाख रुपयांचे उत्पन्न होत असे; परंतु याच काळात संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा वणी आगाराच्या दररोजच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. अन्य काळात वणी आगाराला दररोज तीन लाखांचे उत्पन्न होते. मात्र, मागील ४७ दिवसांपासून हे उत्पन्न बुडत आहे. वणी आगारातील कर्मचाऱ्यांची संख्या २२२ आहे. मात्र, त्यातील ४२ कर्मचारी टप्प्या-टप्प्याने कामावर रुजू झालेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या ४७ दिवसांपासून सुरू असलेल्या बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वणी आगाराला आतापर्यंत एक करोड ६० लाख रुपयांचा फटका बसला आहे. येथील आगारात आजपर्यंत ४२ कर्मचारी कामावर रुजू झाले असून १८० कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. बसफेऱ्याच बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत दामदुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.
३१ ऑक्टोबरपासून हा संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या पर्वात हा संप सुरू झाल्याने वणी आगाराला याचा मोठा आर्थिक फटका बसला. या काळात दररोज वणी आगाराला किमान पाच लाख रुपयांचे उत्पन्न होत असे; परंतु याच काळात संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा वणी आगाराच्या दररोजच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. अन्य काळात वणी आगाराला दररोज तीन लाखांचे उत्पन्न होते. मात्र, मागील ४७ दिवसांपासून हे उत्पन्न बुडत आहे. वणी आगारातील कर्मचाऱ्यांची संख्या २२२ आहे. मात्र, त्यातील ४२ कर्मचारी टप्प्या-टप्प्याने कामावर रुजू झालेत. असे असले तरी १८० कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. संपकाळात वणी आगारातील २० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर पाच कर्मचारी बडतर्फ झालेत.
सद्य:स्थितीत वणी आगारातून केवळ सात फेऱ्या सुरू आहेत. मधल्या काळात काही कर्मचारी रुजू झाल्यानंतर वणी आगाराने वणी-यवतमाळ व वणी-पाटण ही बसफेरी सुरू केली होती. मात्र, या दोन्ही बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. त्यात बसचे नुकसान झाले. यवतमाळ बसवर करंजी येथे तर पाटण बसवर वणी तालुक्यातील मानकी गावाजवळ दगडफेक करण्यात आली होती. या दोन्ही घटनांनंतर संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
त्यानंतर वणी आगाराने बसफेऱ्या बंद केल्या. या दगडफेकीमुळे प्रवाशांच्या मनातदेखील भीती निर्माण झाली. मात्र, दोन दिवसांनंतर पुन्हा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. वणी येथून राळेगाव, पांढरकवडा, झरी, पाटण, मुकुटबन या ठिकाणी टप्प्याटप्प्याने बस सोडण्यात येत आहेत. मात्र, या फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद अल्प आहे. अदिलाबाद वगळता परजिल्ह्यातून वणीत येणाऱ्या बस सध्य बंद आहेत. आदिलाबाद-वणी ही आदिलाबाद आगाराची बस मात्र येथे नियमितपणे येत आहे. बसस्थानकाबाहेर ही बस उभी राहून प्रवासी घेत आहे. त्यामुळे मुकुटबन-झरी मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
खासगी वाहतूक फोफावली
- बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने वणीत खासगी वाहतूक फोफावली आहे. वणी-चंद्रपूर मार्गावर सकाळी ६ वाजतापासून ५० ते ६० ऑटो चंद्रपूरपर्यंत प्रवाशांची ने-आण करीत आहेत. चंद्रपूरचे भाडे तब्बल ३०० रुपये आकारले जात आहे.