WWE मधील स्टार महिला रेसलरचं निधन, वयाच्या ३०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 14:11 IST2022-10-07T14:11:22+5:302022-10-07T14:11:40+5:30
Sara Lee wrestler in WWE: क्रीडा जगतामधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट (WWE) मधील माजी महिला रेसलर सारा ली हिचं आकस्मिक निधन झालं आहे. तिचं वय केवळ ३० वर्ष एवढं होतं.

WWE मधील स्टार महिला रेसलरचं निधन, वयाच्या ३०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
न्यूयॉर्क - क्रीडा जगतामधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट (WWE) मधील माजी महिला रेसलर सारा ली हिचं आकस्मिक निधन झालं आहे. तिचं वय केवळ ३० वर्ष एवढं होतं. सारा ली हिच्या मृत्यूची माहिती तिच्या आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तिच्या निधनाचं वृत्त आल्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये दु:खाची लाट पसरली आहे.
साराच्या आईने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून केवळ सारा ली हिच्या निधनाची माहिती दिली आहे. मात्र तिचा मृत्यू कसा झाला याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही. तिच्या मृत्यूची बातमी कळताच WWE बरोबरच एलेक्सा ब्लिस, बॅकी लिंच, मिक फोलीसारख्या अनेक स्टार्सनी दु:ख व्यक्त केले आहे.
सारा ली हिने WWE मध्ये जवळपास वर्षभर फाईट केले होते. ती २०१६ मध्ये एका लाईव्ह इव्हेंटदरम्यान हील प्रोमो देताना दिसली होती. त्यानंतर काही दिवसांनी जानेवारी महिन्यात सारा ली हिने सिक्स विमन्स टॅग टीम सामन्यामधून इन-रिंग पदार्पण केले होते. त्यावेळी या शोमध्ये मेंडी रोज हिनेही सहभाग घेतला होता.
सारा ली एक सोशल मीडिया सेंसेशनही होती. तिचे फोटो आणि व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात. सारा ली हिने पाच वर्षांपूर्वी WWE स्टार वेज्ली ब्लॅकसोबत विवाह केला होता. ३० डिसेंबर २०१७ रोजी त्यांचा विवाह झाला होता.