नकली बंदूक रोखून १ लाख ६५ हजार लुटले, तिघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 05:00 AM2022-05-20T05:00:00+5:302022-05-20T05:00:34+5:30
फिनकेअर बॅंकेचे वसुली अधिकारी केदार शिवाजी पवार हे फुलसावंगी येथे वसुलीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा या तिघांनी दुचाकीनेच (एमएच २९-बीएल-७५२४) पाठलाग केला. त्यांनी दुचाकीच्या क्रमांकावर चिखल फासला होता. चुरमुरा गावाजवळ या तिघांनी नकली बंदुकीचा धाक दाखवून केदार पवार यांना अडविले. नकली बंदूक आणि लोखंडी राॅडचा धाक दाखवून त्यांच्याजवळील एक लाख ६२ हजारांची रक्कम हिसकावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड/महागाव : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथून बचत गटाची वसुली करून एक लाख ६२ हजार रुपये घेऊन येणाऱ्या फिनकेअर बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्याला तिघांनी लुटले. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्यासुमारास उमरखेड तालुक्यातील चुरमुरा गावानजीक घडली. यातील तीनही आरोपींना महागाव पोलिसांनी जेरबंद केले.
शेख मोहंमद शेख शफीउल्ला (रा. महागाव), महेश मनोहर राठोड आणि राहुल ज्ञानेश्वर राकडे (दोघे रा. करंजखेड) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिनकेअर बॅंकेचे वसुली अधिकारी केदार शिवाजी पवार हे फुलसावंगी येथे वसुलीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा या तिघांनी दुचाकीनेच (एमएच २९-बीएल-७५२४) पाठलाग केला. त्यांनी दुचाकीच्या क्रमांकावर चिखल फासला होता. चुरमुरा गावाजवळ या तिघांनी नकली बंदुकीचा धाक दाखवून केदार पवार यांना अडविले. नकली बंदूक आणि लोखंडी राॅडचा धाक दाखवून त्यांच्याजवळील एक लाख ६२ हजारांची रक्कम हिसकावली. पवार यांना तिघांनी जिवे मारण्याची धमकीही दिली. नंतर ते तिघेही फुलसावंगीकडे निघून गेले. या घटनेची माहिती पवार यांनी उमरखेड पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच शोधमोहीम सुरू केली. महागाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या तिघांनाही महागाव येथेच जेरबंद केले. महागावचे ठाणेदार विलास चव्हाण, जमादार नीलेश पेंढारकर यांनी तत्काळ नाकेबंदी करून आरोपींना ताब्यात घेत उमरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले.