माळपठारातील १० गावांत तीन दिवसांपासून अंधार
By admin | Published: April 8, 2016 02:26 AM2016-04-08T02:26:20+5:302016-04-08T02:26:20+5:30
तालुक्यातील माळपठार भागात मंगळवारी झालेल्या वादळाने मारवाडी वीज उपकेंद्रांतर्गत येणारी १० गावे तब्बल तीन दिवसांपासून अंधारात आहेत.
वितरणचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये तीव्र संताप
पुसद : तालुक्यातील माळपठार भागात मंगळवारी झालेल्या वादळाने मारवाडी वीज उपकेंद्रांतर्गत येणारी १० गावे तब्बल तीन दिवसांपासून अंधारात आहेत. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. तक्रार केल्यानंतरही वीज वितरण दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
माळपठारावरील मारवाडी उपकेंद्रांतर्गत मारवाडी, रोहडा, बेलोरा, पांढुर्णा केदारलिंग, छोटा बेलोरा, वाडी, वागजळी, कुंभारी आदींसह १० गावातील वीज पुरवठा मंगळवारी झालेल्या वादळात खंडित झाला होता. अनेक ठिकाणी वीज खांब वाकले असून ताराही तुटल्या आहे. या परिसराला मारवाडी उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. त्या ठिकाणीही बिघाड असल्याचे बोलले जात आहे. या बाबत नागरिकांनी वीज वितरण कंपनीला माहिती दिली. मात्र तीन दिवस झाले तरी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले नाही. परिणामी १० गावे अंधारात बुडाली आहे.
वीज पुरवठा खंडित असल्याने उन्हाचा असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. तसेच पीठगिरण्या बंद असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. विशेष म्हणजे माळपठार भागात असलेल्या वीज वितरणचे खांब आणि ताराही अतिशय जुन्या आहे. लोखंडी खांब पूर्णत: जंगले असून साधा वारा आला तरी वीज पुरवठा खंडित होतो. आता तर वादळातच वीज यंत्रणा कोलमडल्याचे दिसत आहे. वीज वितरणचे अधिकारी दुरुस्ती करण्याऐवजी नागरिकांची बोळवण करीत आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी माळपठारातील नागरिक करीत आहे. (प्रतिनिधी)
बेलोरा येथे नागरिकांच्या जीवाला धोका
बेलोरा : माळपठारावरील बेलोरा परिसरात वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील वीज खांब जीर्ण झाले असून काही वीज खांबांच्या बुडाशी छिद्र पडले आहे. वादळात हे खांब केव्हाही कोसळू शकतात. वीज वितरण कंपनीला वारंवार सूचना देऊनही दुरुस्ती केली जात नाही. तसेच गत तीन दिवसांपासून या परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा माजी सरपंच सागर मारकड यांनी दिला आहे. (वार्ताहर)