पुसदच्या वसंत प्रतिष्ठानचे दहा कोटींचे काम अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 09:33 PM2018-08-06T21:33:59+5:302018-08-06T21:34:18+5:30
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुसदमध्ये सुरू करण्यात आलेले दहा कोटींच्या वसंत प्रतिष्ठानचे काम आज चार वर्षानंतरही अर्धवट स्थितीत आहे. उलट या कामात तब्बल ८० लाख रुपयांची नियमबाह्यरीत्या अतिरिक्त देयके काढण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नव्या अधीक्षक अभियंत्यांना ‘कन्व्हेन्स’ करण्याचा प्रयत्न होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुसदमध्ये सुरू करण्यात आलेले दहा कोटींच्या वसंत प्रतिष्ठानचे काम आज चार वर्षानंतरही अर्धवट स्थितीत आहे. उलट या कामात तब्बल ८० लाख रुपयांची नियमबाह्यरीत्या अतिरिक्त देयके काढण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नव्या अधीक्षक अभियंत्यांना ‘कन्व्हेन्स’ करण्याचा प्रयत्न होणार आहे.
काँग्रेस आघाडी सरकारमध्ये ३१ जुलै २०१३ ला वसंतराव नाईकांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातील दहा कोटी रुपयातून पुसदच्या सूतगिरणीच्या जागेत वसंत प्रतिष्ठानची इमारत तर दोन कोटी रुपये नाईकांच्या गहूली या गावात स्मारकासाठी देण्याचे निश्चित झाले. दहा कोटीतून काही रक्कम जागेच्या खरेदीसाठी खर्च झाली. उर्वरित इमारतीच्या कामासाठी सहा करार करण्यात आले. परंतु आज चार वर्षे लोटूनही हे काम पूर्ण झाले नाही. कॉलम, बिम, फॅब्रिकेशन, काँक्रिटीकरण यात नियमाबाहेर जावून सुमारे ८० लाखांची अतिरिक्त देयके तयार केली गेली. बहुतांश पेमेंटही दिले गेले. कामाच्या अंतिम मोजमापनंतर हा प्रकार उघडकीस आला. या ८० लाखांच्या अतिरिक्त देयकांच्या मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता चामलवार यांची स्वाक्षरी लागणार आहे. ही स्वाक्षरी मिळविण्यासाठी संबंधित अभियंता व मूळ कंत्राटदारांकडून व्यूहरचना केली जात आहे.
८० लाखांच्या या अतिरिक्त देयकासाठी पुसदचे तत्कालिन शाखा अभियंता जुगल जाधव यांना जबाबदार मानले जात आहे. आपल्याच अधिकारात असल्याने त्यांनी सर्रास वाटेल तेवढी व वाटेल तेव्हा देयके मंजूर केली. उपरोक्त कामे साडेचार व सात टक्के कमी दराने मंजूर झाली आहे. यातून शासनाचे वाचणारे सुमारे ७० ते ८० लाख रुपये या अतिरिक्त कामांच्या रूपाने वळते करण्याचा अभियंता व कंत्राटदाराचा प्रयत्न असावा, असे दिसते. या अतिरिक्त देयकांबाबत सुरुवातीला दिग्रसच्या उपअभियंत्याकडून मोजमाप करून घेतले असता तीन लाखांची अतिरिक्त कामे आढळून आली होती. मात्र त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही व ही देयके आता ८० लाखांवर पोहोचली आहे. या देयकांच्या मंजुरीसाठी दोन वर्षांपासून अधीक्षक अभियंत्याकडे पत्रव्यवहार केला गेला. मात्र ही देयके नेमकी कशी वाढली, हे सांगू शकत नसल्याने अभियंत्याने त्याचा पाठपुरावा केला नाही. त्यातून मध्यम मार्ग म्हणून वसंत प्रतिष्ठानच्या इमारतीमधील लिफ्ट रद्द करण्यात आली आहे.
विशेष असे, या प्रतिष्ठानच्या वॉलकंपाऊंडचा पैसाही इमारतीत वापरला गेला. कंपाऊंड नसल्याने तेथे साडेतीन लाख रुपये खर्चून लावण्यात आलेले लॉन व्यर्थ ठरले आहे. त्यावर गाजर गवत निघाले आहे. कंपाऊंडअभावी ही इमारत दारुडे, प्रेमीयुगुल व टवाळखोरांचे आश्रयस्थान बनले आहे.
अभियंत्याने मिळविला उमरखेडचा अतिरिक्त प्रभार
गेली कित्येक वर्षे पुसदमध्येच ठाण मांडून असलेल्या व वसंत प्रतिष्ठानमधील ८८ लाखांच्या अतिरिक्त देयकाने चर्चेत आलेल्या शाखा अभियंता जुगल जाधव यांनी दीड महिन्यांपूर्वी राजकीय आशीर्वादाने उमरखेडच्या उपअभियंत्याचा अतिरिक्त प्रभार मिळविण्यात यश मिळविले आहे. या अभियंत्याची रस्त्यांच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीची (एएमसी) सहा कामे, पुसद-शेंबाळपिंपरी मार्गातील पॅचेसची कामेही चर्चेत आहेत. कामे न करणे, लांबी-रुंदी कमी करणे, परस्पर देयक मंजूर करणे असे प्रकारही या अभियंत्याबाबत सांगितले जात आहे.