१0 दिवसाआड पाणी
By admin | Published: June 2, 2014 01:49 AM2014-06-02T01:49:29+5:302014-06-02T01:49:29+5:30
गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पावसाळ्यानंतरही अकाली पाऊस पडला.
गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पावसाळ्यानंतरही अकाली पाऊस पडला. त्यामुळे यावर्षी दरवेळच्या तुलनेत पाणीटंचाईच्या झळा कमी बसल्या. पण आता वाढत्या उन्हाच्या तीव्रतेबरोबर येथील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्रपणे बसू लागल्या आहे. आठ ते दहा दिवसाआड नळ योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा २0 हजार लोकसंख्येच्या शहराला त्रस्त करत आहे. विहिरी, हातपंप, बोअरची पातळी खोल गेल्याने नागरिकांची पाण्यासाठी दिवसरात्र भटकंती वाढली आहे. घरात असेल ती लहान मोठी भांडीकुंडी घेवून आणि वाहन, सायकल, पायदळ पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यातच कळमनेर येथील पाणीपुरवठा योजनेला लागू सक्तीचे भारनियमन, याशिवाय वेळोवेळी होणारे अतिरिक्त भारनियमन, वारंवार फुटणारी पाईपलाईन यामुळे नळयोजनेद्वारा होणारा पाणीपुरवठा बेभरवशाचा झाला आहे. गेली अनेक वर्षांपासून कळमनेरला एक्स्प्रेस फिडरच्या माध्यमातून २४ तास वीज पुरवठा करण्याच्या केवळ बाता झाल्या. प्रत्यक्षात काहीच घडले नाही. परिणामी दर उन्हाळ्यात येथील नागरिकांच्या नशिबी पाण्यासाठी मारामारचे चित्र राहात आले आहे. म्हणायला येथे ५५ लाख रुपये खर्च करून दोन-तीन वर्षांपूर्वी बांधलेली जलशुद्धीकरण यंत्रणा आहे. पण या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केल्यास सुरळीत आणि नियमित पाणी पुरवठा होत नाही. म्हणून कळमनेरवरून येथे थेट पाणीपुरवठा केला जातो. फिल्टर प्लांटचा उपयोग फक्त गांधी वॉर्ड, शांतीनगरकरिता होतो. राळेगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना शासनाद्वारे मंजूर झाली. लोकवर्गणीचा अर्धा हिस्सा नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरला. पाईपलाईन व पाणीटाकीचे दोन वेगवेगळे टेंडरही काढण्यात आले. पाच-सहा महिन्यांपूर्वी ते मंजूरही झाले. परंतु जून महिना सुरू होत असताना प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. आगामी १५ दिवसात पाईपलाईन टाकण्याचे काम कंत्राटदारांनी युद्धस्तरावर केले तर पुढील काही महिन्यानंतर ही योजना कार्यान्वित होवू शकेल, अन्यथा पुढील वर्षापर्यंत लांबणार असे दिसते. या दिवसात शेतशिवार, रस्ते खुले आहेत. तेथून आता पाईपलाईन टाकता येईल. पावसाळ्यात आणि पिके उभी झाल्यानंतर ते शक्य होणार नाही. विधानसभा उपाध्यक्ष तथा या क्षेत्राचे आमदार प्रा. वसंत पुरके यांच्यासमोर वेळेच्या आत ही कामे पूर्ण करून घेण्याचे आव्हान आहे.