मारवाडी वनपरिक्षेत्रात दहा लाखांचा अपहार
By Admin | Published: March 28, 2017 01:26 AM2017-03-28T01:26:11+5:302017-03-28T01:26:11+5:30
प्रशिक्षणासाठी गेलेल्या वनरक्षकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून वृक्षलागवडीच्या नावाखाली दहा लाख रुपयांचा अपहार केला ....
वनपाल निलंबित : वनरक्षकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, सीसीएफची कारवाई
पुसद : प्रशिक्षणासाठी गेलेल्या वनरक्षकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून वृक्षलागवडीच्या नावाखाली दहा लाख रुपयांचा अपहार केला गेल्याचा खळबळजनक प्रकार पुसद वनविभागातील मारवाडी वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षकांनी या प्रकरणी वनपालाला तत्काळ निलंबित केले आहे.
पी.एस. ठाकरे असे या निलंबित वनपालाचे नाव आहे. ते मारवाडी वनपरिक्षेत्रात वर्तुळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. येथील वनरक्षक देवकते व अंकलगे हे प्रशिक्षणासाठी गेले होते. हीच संधी साधून वनीकरणाच्या नावाखाली खोटे सही-शिक्के मारून दहा लाखांची रक्कम हडपली गेली. प्रशिक्षणावरून परतल्यानंतर ही गंभीर बाब उजेडात आल्याने त्या दोनही वनरक्षकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. पुसदचे कर्तव्यदक्ष उपवनसंरक्षक (आयएफएस) अरविंद मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी भरारी पथकाचे सहायक वनसंरक्षक के.पी. धुमाळे यांच्याकडे दिली. त्यांनी केलेल्या चौकशीत अफरातफर सिद्ध झाल्याने मारवाडीचे वनपाल पी.एस. ठाकरे यांच्या चौकशीची शिफारस करणारा अहवाल मुंडे यांनी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण यांना सादर केला. त्यानुसार गेल्या आठवड्यात चव्हाण यांनी वनपाल ठाकरे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
या विभागातील गेल्या वर्ष-दोन वर्षात झालेल्या काही प्रकरणांच्या फाईलींना मुंडेंनी हात लावल्यास अनेकांवर निलंबित होण्याची वेळ येऊ शकते, असा वनवर्तुळातील सूर आहे. (प्रतिनिधी)
थेट आयएफएसचा पुसदला फायदा
पुसद वनविभागाला अनेक वर्षानंतर थेट भारतीय वनसेवेचे अधिकारी उपवनसंरक्षक म्हणून लाभल्याने त्याचा फायदा वन विभागाला होतो आहे. गेली कित्येक वर्ष पुसद विभागातील चार तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल राज सुरू आहे. अवैध वृक्षतोड, सागवान तस्करी, वन्यप्राण्यांची शिकार हे प्रकार नित्याचे झाले आहे. सागवान तस्करांची अनेकदा वन यंत्रणेशी मिलीभगत आढळून आली. पुसद विभागातील हे जंगल राज थांबविण्याचे आवाहन आयएफएस उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांच्यापुढे आहे. मुंडे यांच्या कर्तव्यदक्षतेमुळेच दहा लाखांच्या अफरातफरीची प्रामाणिकपणे चौकशी होऊन वनपालाला निलंबित व्हावे लागले.