राज्यातल्या १५ उत्कृष्ट विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळच्या १० जणांची बाजी
By अविनाश साबापुरे | Published: September 18, 2023 08:12 PM2023-09-18T20:12:48+5:302023-09-18T20:13:22+5:30
व्यावसायिक प्रशिक्षणात कामगिरी : यवतमाळ आयटीआयचा राज्यात झेंडा
यवतमाळ : एकेकाळी दुर्लक्षित असलेले आयटीआयमधील विविध अभ्यासक्रम आता विद्यार्थीप्रिय होत आहेत. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रँक निश्चित करणारी परीक्षा नुकतीच पार पडली. त्यात महाराष्ट्रातून निवडलेल्या १५ अव्वल विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळच्या तब्बल १० विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशात यवतमाळची मान उंचावली आहे.
विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी यवतमाळच्या शासकीय आयटीआयचे विद्यार्थी आहेत. शासनामार्फत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली होती. यात राज्यातील सर्वच आयटीआयमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून महाराष्ट्रातील अव्वल १५ विद्यार्थी नुकतेच घोषित करण्यात आले आहेत. या १५ पैकी १० जण यवतमाळचे आहेत, हे विशेष. यामध्ये स्नेहल राठोड, अनुराग मनवर, मनिषा मेश्राम या तिघांनी ६०० पैकी ५९९ गुण घेत पहिली रँक मिळविली. अंकिता आंबटवार, ऋतुजा आरेकर यांनी ५९८ गुणांसह दुसरी रँक मिळविली. तर गायत्री चौधरी, रोहीत खामनकर, कुणाल गवळी, पूजा कपाट, विशाल पोपळघट या विद्यार्थ्यांनी ५९७ गुणांसह तिसरी रँक पटकावली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पदवी व ट्रॉफी देऊन १७ सप्टेंबर रोजी नागपूर येथे सत्कार करण्यात आला. यवतमाळ शासकीय आयटीआयचे प्राचार्य विनोद नागोरे, व्यवसाय निदेशक देऊळकर, संजय पोटे, एफ. डी. राठोड, अनिल अनंतवार आदी मार्गदर्शकांचे परिश्रम यानिमित्ताने सत्कारणी लागले आहेत.