नागपूरच्या धोनी क्रिकेट अकादमीत १०० खेळाडूंना मोफत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:07 PM2018-08-08T16:07:55+5:302018-08-08T16:08:19+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नागपूर येथे भारतातील पहिली निवासी क्रिकेट अकादमी स्थापन केली आहे. यात विदर्भातील (नागपूर वगळता) १०० खेळाडूंना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नागपूर येथे भारतातील पहिली निवासी क्रिकेट अकादमी स्थापन केली आहे. यात विदर्भातील (नागपूर वगळता) १०० खेळाडूंना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. यासाठी २५ व २६ आॅगस्ट रोजी येथील बालाजी स्पोर्टस अकादमीवर नि:शुल्क निवड चाचणी होत आहे, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
एसजीआर स्पोर्टस अकादमी नागपूर आणि अर्का स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमीची स्थापना डोंगरगाव (नागपूर) येथे करण्यात आली आहे. क्रिकेट क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडूंचा गुणात्मक विकास व्हावा, विदर्भातील क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, राष्ट्रीय पातळीवर वैदर्भीय खेळाडू यावेत या उद्देशाने ही अकादमी स्थापन करण्यात आली आहे. नागपूर वगळता विदर्भाच्या इतर जिल्ह्यातील खेळाडूंना अकादमीत विनाशुल्क प्रवेश मिळणार आहे.
खेळाडूंना अत्याधुनिक बॉलिंग मशिन्स व इतर क्रीडा उपकरणाद्वारे बीसीसीआयच्या तज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात महिंद्रसिंग धोनी हे या क्रिकेट अकादमीचे औपचारिक उद्घाटन करणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यवतमाळ येथे निवड चाचणीत ६ वर्षावरील खेळाडू सहभागी होऊ शकतात. यासाठी नोंदणी बालाजी स्पोर्टस अकादमीचे राजन भुरे यांच्याकडे करता येईल, असे यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला एसजीआर स्पोर्टसचे अध्यक्ष मंगेश राऊत, लवलेश राऊत, राजन भुरे आदी उपस्थित होते.