यवतमाळात विधान परिषदेसाठी 100 टक्के मतदान; चतुर्वेदी अन् बाजोरियांचं भविष्य मतपेटीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 05:25 PM2020-01-31T17:25:51+5:302020-01-31T17:37:39+5:30

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी शंभर टक्के मतदान पार पडले. 

100% voting for Legislative Council in Yavatmal | यवतमाळात विधान परिषदेसाठी 100 टक्के मतदान; चतुर्वेदी अन् बाजोरियांचं भविष्य मतपेटीत बंद

यवतमाळात विधान परिषदेसाठी 100 टक्के मतदान; चतुर्वेदी अन् बाजोरियांचं भविष्य मतपेटीत बंद

Next

यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी शंभर टक्के मतदान पार पडले.  प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने यवतमाळची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यातील सात केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्व ठिकाणी शंभर टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. एकूण ४८९ मतदार आहेत. त्यामध्ये २४५ पुरुष तर २४४ महिला मतदारांचा समावेश आहे.

सकाळच्या सत्रात उमरखेड व पुसदमध्ये मतदानाची टक्केवारी अनुक्रमे ३ व २२ असली तरी सायंकाळी मात्र मतदानाची टक्केवारी वाढली. सर्व शंभर टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. सातही मतदान केंद्रांवर पोलिसांकडून मतदारांची कसून तपासणी केली गेली. फोटो काढता येईल अशी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मतदान केंद्रात जाणार नाही, याची खास खबरदारी निवडणूक पथकाकडून घेतली गेली. महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे सुमित बाजोरिया यांच्यात ही थेट लढत झाली.

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला असून सुरक्षेच्या दृष्टीने मतदारांना सहलीही घडविण्यात आल्या. महाविकास आघाडीने आपल्या मतदारांकडून एकजुटीची शपथ घेतली. अवैध मतदान टाळण्याच्या दृष्टीने गुरुवारी नागपुरात मतदारांकडून प्रत्यक्ष मतदानाचे प्रात्यक्षिकही महाविकास आघाडीने करून घेतले. यवतमाळातील बचत भवनात ४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. चतुर्वेदी बाजी मारतात की बाजोरिया याचा फैसला ४ फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतरच होणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात सट्टाबाजारही तेजीत होता.

Web Title: 100% voting for Legislative Council in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.