१०१ मद्यपी वाहनचालक ट्रॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:00 AM2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:01+5:30
३१ डिसेंबरच्या रात्री मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत जिल्हाभर सर्वांनीच साजरे केले. या ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले गेले होते. कुणी सामूहिक तर कुणी थंडीमुळे घरातच थर्टी फर्स्ट साजरे केले. परंतु निरोप व स्वागताचा हा सोहळा शांततेत पार पडावा म्हणून कडाक्याच्या थंडीतही जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. ७१ पोलीस अधिकारी, ५७७ कर्मचारी व १६५ होमगार्ड तैनात करण्यात आले होते. एकीकडे सर्वजण नववर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना पोलीस मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत रस्त्यावर तैनात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नववर्षाच्या स्वागताचा सर्वत्र जल्लोष सुरू असताना पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी मात्र जिल्हाभर कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य बजावत होते. पार्टी साजरी करून येणाऱ्या वाहनांची व चालकांची तपासणी केली गेली. त्यात दारू पिऊन जीवाची पर्वा न करता वाहन चालविणारे १०१ चालक पोलिसांनी ट्रॅप केले. त्यांच्यावर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
३१ डिसेंबरच्या रात्री मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत जिल्हाभर सर्वांनीच साजरे केले. या ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले गेले होते. कुणी सामूहिक तर कुणी थंडीमुळे घरातच थर्टी फर्स्ट साजरे केले. परंतु निरोप व स्वागताचा हा सोहळा शांततेत पार पडावा म्हणून कडाक्याच्या थंडीतही जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. ७१ पोलीस अधिकारी, ५७७ कर्मचारी व १६५ होमगार्ड तैनात करण्यात आले होते. एकीकडे सर्वजण नववर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना पोलीस मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत रस्त्यावर तैनात होते. या काळात वाहन तपासणी, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना समज, चालण्याच्याही स्थितीत नसलेल्यांना घरापर्यंत सोडणे आदी कर्तव्ये पोलिसांनी पार पाडली.
कुटुंबाचा विचार करा, दारू पिऊन वाहन चालवू नका, नववर्षाचे स्वागत करा, परंतु नियम व कायद्यात राहून असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, यवतमाळच्या एसडीपीओ माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अनिल किनगे आदींनी जनतेला केले होते. मात्र काहींनी या आवाहनाला फाटा देत दारू पिऊन वाहन चालविणे सोडले नाही. पोलिसांनी जिल्हाभर केलेल्या या तपासणीत तब्बल १०१ वाहन चालक दारू पिऊन असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
१५१ ठिकाणी नाकाबंदी
जल्लोष साजरा करण्यासाठी पहाटे ५ वाजेपर्यंतची सूट प्रशासनाने दिली होती. मात्र कुणीही स्वैराचार करू नये यासाठी २९ डिसेंबरपासूनच वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली. तर पोलीस ठाणे स्तरावर ३१ डिसेंबरला १५१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी जिल्ह्यात दोन हजार ७६९ जणांविरूद्ध मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई केली.
१९३८ वाहनांची तपासणी
यावेळी पोलिसांनी एक हजार ९३८ वाहनांची तपासणी केली. त्यासाठी १५१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यवतमाळ शहरात सर्वाधिक नाकाबंदी लावली होती. मद्य पिऊन गाडी चालविणाºया १०१ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. मुंबई पोलीस कायदा व इतर कायद्यांतर्गत दोन हजार ५१७ जणांवर कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतुकीच्या १५१ केसेस केल्या. दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या तिघांविरूद्ध कारवाई केली. दारूबंदी अधिनियमानुसार चार जणांविरूद्ध कारवाई केली. जिल्हा वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा व प्रत्येक पोलीस ठाणेस्तरावरच्या अधिकारी, कर्मचाºयांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
सर्वकाही शांततेत
मंगळवारी रात्री ठिकठिकाणी पार्ट्या झाल्या, मोठ्या प्रमाणात मद्य रिचविले गेले, मात्र नववर्षाच्या या स्वागताला जणू पोलिसांचे सुरक्षा कवच लाभले होते. पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रभर थंडीतही रस्त्यावर होते. त्यामुळेच कुठे काही भानगड उद्भवली नाही. पर्यायाने मावळत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाच्या स्वागताचे ठिकठिकाणचे सोहळे व जल्लोष अगदी शांततेत पार पडले. त्याचे श्रेय पोलिसांना दिले जाते.