‘१०८’ने दिले २० हजार रुग्णांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:00 AM2020-12-14T05:00:00+5:302020-12-14T05:00:08+5:30
कोरोना या संसर्गजन्य आजाराची सुरुवातीला अनेकांनी धास्ती घेतली होती. कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यही मदतीसाठी पुढे येताना दिसत नव्हते. अशा स्थितीत या गंभीर रुग्णांना कोविड रुग्णालयात पोहोचविण्याचे दायित्व १०८ रुग्णवाहिकेवरील चालक, वाहक व डाॅक्टरांनी निभावले. कोविडच्या काळात इतर रुग्णवाहिका, वाहनेसुद्धा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे दुर्धर आजाराच्या इतर रुग्णांनाही अडचणीच्या काळात मदत मिळत नव्हती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : १०८ रुग्णवाहिका सेवा ही रुग्णांसाठी जीवनदायिनी आहे. अपघातासोबतच आपत्कालीन स्थितीत तातडीने जखमी आणि इतर रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याचे मोठे साधन आहे. या रुग्णवाहिकेत प्रशिक्षित डाॅक्टर असल्याने जागेवरच प्राथमिक उपचार केले जातात. यामुळेच कोरोना महामारीच्या संकटातही २० हजार ३०८ रुग्णांना नोव्हेंबरअखेरपर्यंत जीवनदान मिळाले आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराची सुरुवातीला अनेकांनी धास्ती घेतली होती. कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यही मदतीसाठी पुढे येताना दिसत नव्हते. अशा स्थितीत या गंभीर रुग्णांना कोविड रुग्णालयात पोहोचविण्याचे दायित्व १०८ रुग्णवाहिकेवरील चालक, वाहक व डाॅक्टरांनी निभावले. कोविडच्या काळात इतर रुग्णवाहिका, वाहनेसुद्धा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे दुर्धर आजाराच्या इतर रुग्णांनाही अडचणीच्या काळात मदत मिळत नव्हती. तेव्हा हक्काची १०८ रुग्णवाहिकाच मदतीला धावून आली. ‘काॅल केला आणि काही मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचल्याने जीव वाचला’ अशी प्रतिक्रिया देणारे अनेक आहेत.
कोरोना काळात दिवस-रात्र रुग्णवाहिका सेवेत
कोरोना आजाराबाबत आता यंत्रणा व समाजात बऱ्यापैकी जागृती झाली आहे. सुरुवातीला अनेक गैरसमज असल्याने कोरोना रुग्णांनाही रुग्णालयापर्यंत आणताना मोठी कसरत करावी लागत होती. त्यात शासकीय यंत्रणेसोबत १०८ रुग्णवाहिका चालक, डाॅक्टर यांनी खंबीरपणे भूमिका बजाविली आहे.
इतर आजारांच्या रुग्णांनाही मदत
कोरोना काळात बऱ्याच खासगी डाॅक्टरांनी प्रॅक्टिस बंद केली होती. रुग्णवाहिका चालकही संभ्रमात होते. या स्थितीत १०८ रुग्णवाहिकेने प्रभावीपणे काम केले. ग्रामीण भागातील इतर आजारांच्या रुग्णांना तातडीने शासकीय व इतर रुग्णालयांत पोहोचविण्यासाठी वेळेत मदत केली. यामुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुरुवातीला अडचणी
मार्च, एप्रिल, मे, जून या कोरोना लाटेच्या सुरुवातीच्या काळात सुरक्षा साधनांबाबत डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
नंतर पीपीई कीट, मास्क, ग्लोज, सॅनिटायझर यांचा पुरवठा सुरळीत झाला. तेव्हापासून आजतागायत सुरक्षा साधनांची कमतरता भासली नाही. उलट यंत्रणेचे सहकार्य पूर्णपणे मिळत आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या संकटात समाजासाठी काम करण्याची संधी रुग्णवाहिका चालक म्हणून मिळाली. विशेष करून मारेगाव व दिग्रस येथून कोरोनाचे गंभीर अवस्थेतील रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीबाबत शंका होती. मात्र, काही आठवड्यांनंतर त्या रुग्णांना सुखरूप घरी सोडल्याचे समाधान आहे.
-मोहम्मद जुबेर मोहम्मद निसार, रुग्णवाहिका चालक