दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका महिनाभर ‘लाॅकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:00 AM2021-04-17T05:00:00+5:302021-04-17T05:00:07+5:30
दहावी-बारावीची परीक्षा यंदा २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ शासनावर आली. आता ही परीक्षा मे-जून महिन्यात घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, त्याच्या तारखेबाबत अद्याप निश्चितता नाही. परंतु, आधी एप्रिलमध्येच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप करून टाकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दरवर्षी बोर्ड विद्यार्थ्यांची परीक्षा घेते; पण यंदा परीक्षेमुळे खुद्द बोर्डाचीच धाकधूक वाढली आहे. कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा महिनाभर लांबणीवर पडल्या; पण तत्पूर्वीच शाळांना वाटप केलेल्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सीलबंद उत्तरपत्रिका महिनाभर ‘कस्टडी’त सांभाळून ठेवण्याची संवेदनशील जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे.
दहावी-बारावीची परीक्षा यंदा २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ शासनावर आली. आता ही परीक्षा मे-जून महिन्यात घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, त्याच्या तारखेबाबत अद्याप निश्चितता नाही. परंतु, आधी एप्रिलमध्येच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप करून टाकले. अमरावती विभागीय मंडळानेही यवतमाळ, पुसद येथे प्रतिनिधी पाठवून शाळांपर्यंत साहित्य पोहोचविले. मात्र, परीक्षा केंद्रांपर्यंत हे साहित्य पोहोचले आणि दुसऱ्याच दिवशी परीक्षेची तारीख लांबल्याची घोषणा झाली. आता या साहित्याचे काय करावे, असा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे.
या साहित्यामध्ये कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राॅप्ट, स्टिकर, सिटिंग प्लॅन, ए-बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, ओएमआर गुणपत्रिका, आदींचा समावेश आहे. आता हे साहित्य केंद्र संचालकांनीच स्वत:च कस्टडीत जपून ठेवावे, संबंधित शाळांना वाटप करू नये, असे आदेश गुरुवारी अमरावती विभागीय मंडळाच्या सहसचिव डाॅ. जयश्री राऊत यांनी दिले आहेत. परंतु, जिल्ह्यात यंदा कोरोनामुळे परीक्षा केंद्रांची संख्या वाढली आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात, तेथेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. ही वाढीव संख्या पाहता अनेक केंद्र संचालकांनी आपल्या उपकेंद्रांना हे साहित्य तडकाफडकी वाटून टाकल्याचीही शक्यता आहे. आता अशा ‘लाॅक्ड’ उत्तरपत्रिकांबाबत गफलत झाल्यास परीक्षेत मोठा घोळ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ६७ हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
जिल्ह्यात तब्बल ६७ हजार विद्यार्थी यंदा दहावी-बारावीला आहेत. कोरोनामुळे शाळा होवो न होवो, पण वर्ष महत्त्वाचे असल्याने या विद्यार्थ्यांनी जमेल तशी परीक्षेची तयारी केली आहे. त्यात शाळांनीही विविध उपक्रमांतून तयारी करवून घेतली. परंतु, आता परीक्षेची तारीख महिनाभर लांबली. त्यातही कोरोनामुळे परीक्षा नेमकी कधी घेतली जाणार, घेणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. सीबीएसईने तर दहावीची परीक्षाच रद्द केल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्येही द्विधावस्था आहे.