दहावीत पुसदची सुरभी जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:16 PM2018-06-08T23:16:39+5:302018-06-08T23:16:39+5:30
दहावीच्या परीक्षेत पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालयाची विद्यार्थिनी सुरभी अनिल आहाळे ही ९९.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल आली आहे. दहावीच्या निकालात अमरावती बोर्डात जिल्हा माघारला असून जिल्ह्याचा निकाल ८३.९९ टक्के लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावीच्या परीक्षेत पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालयाची विद्यार्थिनी सुरभी अनिल आहाळे ही ९९.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल आली आहे. दहावीच्या निकालात अमरावती बोर्डात जिल्हा माघारला असून जिल्ह्याचा निकाल ८३.९९ टक्के लागला आहे. ५२६ शाळांपैकी ५६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेवर गर्दी झाली होती. मात्र अनेकांनी आपल्या मोबाईलवरूनच निकाल माहीत करून घेतला.
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ३९ हजार ८४९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३३ हजार ४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सहा हजार एक विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. तर १२ हजार २१९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२ हजार ३३२ विद्यार्थी द्वितीय आणि दोन हजार ९१८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्यातून २१ हजार ११९ मुले परीक्षेला बसले होते. त्यापैकी १७ हजार १५९ म्हणजे ८०.९४ टक्के मुले उत्तीर्ण झाली. तर १८ हजार ६५० मुलींपैकी १६ हजार ३११ मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८७.४६ टक्के आहे. यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील शाळांनी गुणवत्तेत शहरी भागांना मागे सोडले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नेर तालुक्याचा ८९.८५ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी राळेगाव तालुक्याचा ७५.९१ टक्के निकाल आहे. निकालाची प्रचंड उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही होती. उच्च श्रेणीत पास झालेल्या विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
५६ शाळांचा निकाल १०० टक्के
यवतमाळ जिल्ह्यातील ६२५ शाळांपैकी ५६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, यवतमाळ, आबासाहेब पारवेकर विद्यालय, यवतमाळ, शासकीय आश्रमशाळा चिंचघाट, प्रियदर्शनी उर्दू कन्या शाळा डोर्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय उमरसरा, उर्दू हायस्कूल पोबारू ले-आऊट यवतमाळ, क्रिसेन्ट स्कूल यवतमाळ, संस्कार स्कूल यवतमाळ, सुसंस्कार विद्या मंदिर आणि ग्लोरिअस स्कूल यवतमाळ, राजाराम विद्यालय मालखेड बु. ता. नेर, उर्दू कन्या हायस्कूल नेर, प्रियदर्शनी उर्दू विद्यालय नेर, रमाई आश्रमशाळा बाणगाव, जीवन विकास विद्यालय नेर, इलिगंट स्कूल नेर, मौलाना उर्दू हायस्कूल नेर, शांतीनिकेतन मॉन्टेसरी स्कूल नेर, सुभाषचंद्र बोस विद्यालय रामगाव ता. दारव्हा, छत्रपती शिवाजी विद्यालय शेलोडी, कन्या विद्यालय बोरीअरब, डॉ.अल्लमा इकबाल उर्दू विद्यालय लाडखेड, नारायणराव कोषटवार स्कूल दिग्रस, दामोधर पाटील स्कूल दिग्रस, शासकीय निवासी मुलांची शाळा इसापूर ता. दिग्रस, ईश्वर देशमुख विद्यालय दिग्रस, विद्याभारती स्कूल दिग्रस, सनराईज कॉन्व्हेंट विद्यालय आर्णी, मातोश्री पार्वतीबाई नाईक स्कूल पुसद, पी.यू.हायस्कूल पुसद, गुणवंतराव देशमुख उर्दू विद्यालय जांबबाजार, मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळा मरसूळ, मनोहरराव नाईक व्हीजेएनटी शाळा येरंडा, सुधाकरराव नाईक विद्यालय घाटोडी, गणपतराव पाटील विद्यालय बोरगडी, जनता स्कूल पुसद, शासकीय मुलींची निवासी शाळा पुसद, राणीलक्ष्मीबाई विद्यालय पुसद, मातोश्री विद्यालय श्रीरामपूर, शिवरामजी मोघे विद्यालय मोरचंडी, युनिर्व्हसल स्कूल उमरखेड, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोरटा, स्टुडंट वेलफेअर स्कूल दहेगाव, ज्ञानज्योती स्कूल ढाणकी, सुधाकरराव नाईक उर्दू विद्यालय काळी दौलत, जनता शिक्षण प्रसारक मंडळ उर्दू विद्यालय फुलसावंगी, मुलींची शासकीय निवासी शाळा महागाव, उर्दू हायस्कूल सावर, पी.एम. रुईकर ट्रस्ट नांझा ता. कळंब, पोस्ट बेसिक आश्रमशाळा सावरखेडा, स्मॉल वंडर स्कूल वडकी ता. राळेगाव, विद्यानिकेतन स्कूल मारेगाव, आदर्श विद्यालय चालबर्डी ता. पांढरकवडा, शासकीय विद्यानिकेतन पांढरकवडा, डॉ. यार्डी स्कूल उमरी ता. पांढरकवडा, जयअंबे स्कूल पांढरकवडा, गुरूकुल कॉन्व्हेंट मुकुटबन, वणी पब्लिक स्कूल वणी, एसपीएम स्कूल घाटंजी यांचा समावेश आहे.
सुरभी आहाळेला डॉक्टर व्हायचेयं
शिक्षक दाम्पत्याची कन्या असलेल्या सुरभी आहाळे हिला आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणेच डॉक्टर व्हायचे आहे. वर्षभर सातत्याने अभ्यास करून हे यश मिळविल्याचे तिने सांगितले. सुरभीचा जुळा भाऊ संकेत आणि सुरभी एकाच वर्गात को.दौ. विद्यालयात शिकत होते. सुरभीला ९९.४० टक्के तर संकेतला ९७.६० टक्के गुण मिळाले आहे. सुरभीचे वडील अनिल आहाळे माणिकडोह येथील जिल्हा परिषद शाळेत तर आई अंजली लोणी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. सुरभीची मोठी बहीण अबोली सध्या एमबीबीएस तृतीय वर्षाला शिकत आहे. अबोलीच्या पावलावर पाऊल ठेऊन सुरभी आणि संकेतलाही डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करायची आहे.
यवतमाळ शहरात जायन्टस्ची शर्वरी डंभे प्रथम
यवतमाळ शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. त्यात जायन्टस् इंग्लिश मीडियम स्कूलची शर्वरी धनराज डंभे ही ९८.६० टक्के गुण घेऊन यवतमाळ शहरात अव्वल आली आहे. राणीलक्ष्मीबाई विद्यालयाची वैष्णवी राजू बोडखे हिला ९८.४० टक्के, तन्वी मंगेश कंवर ९८ टक्के, विवेकानंद विद्यालयाचा प्रथमेश रमेश राठोड ९८.२० टक्के, डॉ. नंदूरकर विद्यालयाची स्नेहा राजू खाकरे ९५.६० टक्के, जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियमची तेजल रवींद्र उपलेंचवार ९७.८० टक्के, अणे विद्यालयातील रोहित सुरेश जाधव ९६ टक्के, सुसंस्कार विद्यामंदिरचा दीप अविनाश पांडे ९५ टक्के यांचा समावेश आहे.