११ रणरागिणी करणार यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे सारथ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 02:32 PM2020-08-13T14:32:22+5:302020-08-13T14:35:28+5:30
यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे सारथ्य करण्यासाठी त्या ११ रणरागिणी सज्ज झाल्या आहेत.
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महिलांनी वाहन चालविणे हे आता नवलाईचं राहिलं नाही. वाहनच काय, विमान, रेल्वे या क्षेत्रातही महिला पुरुषांच्या बरोबरीने कामगिरी करत आहेत. यवतमाळ जिल्हा पोलीस दलात आतापर्यंत महिला वाहनचालक हे पदच नव्हते. जिल्हा पोलीस दलातील ११ महिला पोलीस शिपायांनी हे आव्हान स्वीकारले. वरिष्ठांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी वाहनचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी लागणारे प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केले. आता जिल्हा पोलीस दलाचे सारथ्य करण्यासाठी त्या ११ रणरागिणी सज्ज झाल्या आहेत.
पोलीस दलात महिलांना ३३ टक्के आरक्षण आहे. पुरुषांच्या बरोबरीने त्या पोलीस दलात प्रत्येक जबाबदारी पार पाडतात. इतकेच नव्हे तर काही महिला अधिकारी पोलीस शिपायांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसाही उमटविला आहे. जे पुरुषांनाही शक्य होत नाही, अशा काही बाबी महिलांनी घडवून आणल्यात. पोलीस दलातील वाहनचालक हे एकमेव पद महिलांच्याविना होते. आता त्यावरही महिलांनी दावा केला असून त्यासाठी त्या सक्षम असल्याचे स्वत:ला सिद्ध केले आहे.
पोलीस महासंचालकांनी ग्रामीण भागातील पोलीस दलातील महिला चालक निवडण्याबाबत प्रस्ताव मागितले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी हे प्रस्ताव सर्वच ३१ पोलीस ठाण्यात महिलांपुढे ठेवले. या प्रस्तावाला १५ महिला पोलिसांनी प्रतिसाद दिला. या १५ जणांचे अर्ज पोलीस चालक प्रशिक्षण शाळा औंध पुणे येथे पाठविण्यात आले. तेथे १५ पैकी ११ जणींची निवड झाली. त्यांनी ४५ दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. आता त्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलात कुठलेही वाहन चालविण्यासाठी सज्ज आहेत. या महिला चालकांना मोटर वाहन परिवहन विभागाचे पोलीस निरिक्षक राजेंद्र जाधव, सहायक फौजदार भानुदास उम्रतकर यांचे मार्गदर्शन लाभले.
दारव्हा ठाण्यातील अश्विनी कंटारे, माला वानखडे, यवतमाळ ठाण्यातील बबिता राठोड, प्रिया मुंदेकर, शुभांगी डेहनकर, निशादबी पठाण, ग्रामीण पोलीस ठाण्यातील दीपाली भेंडारे, नियंत्रण कक्षातील अलका कांबळे, बिंदू जोगळेकर, परिवहन विभागातील पूजा बनसोड या रणरागिणी आता जिल्हा पोलीस दलाच्या वाहनाचे सारथ्य करण्यासाठी तयार आहे.