जात पंचायतीच्या ११ सदस्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:06 AM2018-05-17T06:06:09+5:302018-05-17T06:06:09+5:30
सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी मेहतर समाज जात पंचायतीच्या सरपंचासह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्याची घटना पुसद येथे घडली.
पुसद (यवतमाळ) : सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी मेहतर समाज जात पंचायतीच्या सरपंचासह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्याची घटना पुसद येथे घडली. जात पंचायतीने एका परिवाराला समाजातून बहिष्कृत केले होते. या परिवाराने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहतर समाज जात पंचायतीचे सरपंच भैय्यालाल टाक, गणेश डंगोरिया, आनंद डागर, दयाल डागर, सुनील टाक, संतोष टाक, संजू पवार, भारत डागर, प्रकाश नकवाल, श्याम टाक, रोहिदास डंगोरिया सर्व रा. नवलबाबा वार्ड पुसद अशी गुन्हा दाखल झालेल्या जात पंचायत सदस्यांची नावे आहे. अमर अशोक तुंडलायत हे १३ सदस्यीय कुटुंबासह नवलबाबा वार्डात राहतात.
त्यांचे कुटुंबीय सतत भांडण करून समाजाची बदनामी करतात, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. याच कारणाने ७ डिसेंबर २०१७ रोजी जात पंचायतीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत सरपंच भैय्यालाल टाक व इतर ११ सदस्यांनी तुंडलायत कुटुंबाला जातीतून व समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्याशी समाजातील कोणत्याच व्यक्तीने बोलू नये, कोणतेही संबंध ठेऊ नये असा निर्णय घेण्यात आला. याबाबत अमर तुंडलायत यांनी पुसद शहर ठाण्यात जात पंचायतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करून ठाणेदार अनिलसिंह गौतम यांनी ११ सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.