रस्त्यासाठी ११०० वृक्ष तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 09:02 PM2018-12-06T21:02:06+5:302018-12-06T21:03:16+5:30

हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे.

1100 trees will be broken for the road | रस्त्यासाठी ११०० वृक्ष तुटणार

रस्त्यासाठी ११०० वृक्ष तुटणार

Next
ठळक मुद्देयवतमाळ-दारव्हा-वाशिम मार्ग : झाडावर मार्किंग, विकासासाठी निसर्गाची हानी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे. सर्वाधिक निसर्गरम्य रस्ता अशी या रस्त्याची ओळख आता वृक्षकटाईने पुसली जाणार आहे.
यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी मोजमाप सुरू झाले आहे. यवतमाळ, बोरी, दारव्हा, कुपटा मार्गे मंगरूळपीर असा हा ९४ किमीचा रस्ता आहे. या रस्त्यात यवतमाळ ते बोरी अरबपर्यंत ११०० डेरेदार वृक्ष आहेत. यामध्ये वड, कडूनिंबाच्या झाडांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही झाडे ब्रिटिशकालीन आहेत.
एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावरून प्रवास करावा असाच हा वैभवशाली रस्ता आहे. या रस्त्याचे मॉडेल संपूर्ण देशभरात अवलंबण्याची गरज आहे. तरी हे डेरेदार वृक्ष रस्ता रूंदीकरणात जमीनदोस्त होतील. त्याकरिता झाडांवर मार्किंग केली जात आहे. जामवाडीजवळील हेटीपर्यंत या वृक्षांची नोंद झाली. समोरची हद्द वनविभागाची आहे. त्यात दोन्ही बाजूंनी सागाचे वृक्ष आहे. त्यावर नोंद बाकी आहे. मात्र त्या झाडांनाही मार्किंग करून तोडले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गावकरी म्हणतात झाडे वाचवा, पण विकासही हवाच
रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडू नये, अशी मागणी गावांमधून होत आहे. मात्र त्यांची ही मागणी सरकारी यंत्रणा विकासाच्या नावावर नजरेआड करत आहे. वृक्षाची कटाई झाली तरी नव्याने वृक्ष लावले जातील, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात आजपर्यंत बांधण्यात आलेल्या राज्य मार्गावरील तोडलेल्या वृक्षांची नंतर काय अवस्था झाली हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे वृक्षतोडीला पर्याय शोधण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. विकास आणि निसर्ग दोन्ही हवे आहेत, असेच ते म्हणत आहेत.

वृक्ष पुनर्रोपण ही अवघड बाब
यवतमाळातील मोठे वृक्ष तुटू नये म्हणून वृक्ष पुनर्रोपण करण्याचा प्रयोग हाती घेतला. मात्र मोजकीच झाडे ‘शिफ्ट’ झाली. इतर झाडे तुटलीच. आज प्रत्येक झाड महत्त्वाचे आहे. असे असताना वृक्ष तुटले तर पुन्हा असे वृक्ष उभे राहतील काय, हे सांगणे अवघड आहे.

रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने अभियंत्यांना कळविले आहे. झाडे वाचविण्यासाठी ती पुनर्स्थापित केली जाईल. नाईलाजाने तुटली तर नव्याने झाडे लावले जातील.
- धनंजय चामलवार
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: 1100 trees will be broken for the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.