११२७ सिंचन विहिरींच्या कामाला सुरुवातच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:05 AM2017-07-24T01:05:21+5:302017-07-24T01:05:21+5:30
विदर्भ सिंचन विहिरी योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या तब्बल ११२७ धडक सिंचन विहिरींच्या कामाला अद्याप सुरूवातच झाली नाही.
मुदत संपली : शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न भंगले, मजूर नसल्याचे कारण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदर्भ सिंचन विहिरी योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या तब्बल ११२७ धडक सिंचन विहिरींच्या कामाला अद्याप सुरूवातच झाली नाही. आता खोदकाम व बांधकामाची मुदत संपल्याने या विहिरी पूर्ण होणार किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने विदर्भ सिंचन विहिरी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना धडक सिंचन विहिरी बांधून देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेमार्फत १२ हजार ९९७ शेतकऱ्यांना धडक सिंचन विहिरी मंजूर झाल्या. मात्र विविध कारणांनी या विहिरींचे काम रखडले. कधी निधी नाही, तर कधी मजूर मिळत नसल्याची लंगडी सबब त्यासाठी पुढे केली गेली. परिणामी तब्बल ११२७ विहिरींचे खोदकाम अद्याप सुरूच झाले नाही. आता ३० जूनला मुदत संपल्याने या विहिरी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न कोमेजले आहे.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेतून आत्तापर्यंत दहा हजार विहिरी पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. मात्र त्यातही अनेक ठिकाणी किरकोळ कामे बाकी आहेत. अनेक शेतकऱ्यांना निधीही मिळाला नाही. सध्या दोन हजार ७८४ विहिरींचे खोदकाम, बांधकाम अपूर्णच आहे. जिल्ह्यात आजमितीस केवळ एक हजार ३८५ विहिरींचे खोदकाम, बांधकाम सुरू आहे. मात्र पावसाळ्यामुळे त्यातही बाधा निर्माण झाली आहे.
दोनदा मिळाली मुदतवाढ
धडक सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या ३० जून २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तत्पूर्वी एकदा या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. सतत दोनदा मुदतवाढ देऊनही या विहिरी पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा पुढील ३० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली. सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या मागणीचे पत्र शासनाला पाठविले.