१२ जणांच्या मृत्यूने हादरला कोसदनी घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 10:26 PM2018-06-01T22:26:21+5:302018-06-01T22:26:21+5:30

तालुक्यातील कोसदनी घाट अपघातासाठी कुप्रसिद्ध. असा एकही आठवडा जात नाही की अपघात झाला नाही. अपघाताची सवय झालेला हा घाट मात्र शुक्रवारी पहाटे १२ जणांच्या मृत्यूने हादरला. सोशल मीडियावरील फोटो पाहून जिल्ह्यातील प्रत्येकाच्या अंगावर काटे उभे राहिले.

12 killed in death | १२ जणांच्या मृत्यूने हादरला कोसदनी घाट

१२ जणांच्या मृत्यूने हादरला कोसदनी घाट

Next
ठळक मुद्देमदतीचा ओघ : आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात, नांदेडला जाताना काळाचा घाला

राजेश कुशवाह / हरिओम बघेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील कोसदनी घाट अपघातासाठी कुप्रसिद्ध. असा एकही आठवडा जात नाही की अपघात झाला नाही. अपघाताची सवय झालेला हा घाट मात्र शुक्रवारी पहाटे १२ जणांच्या मृत्यूने हादरला. सोशल मीडियावरील फोटो पाहून जिल्ह्यातील प्रत्येकाच्या अंगावर काटे उभे राहिले. पंजाब, दिल्लीमधून आलेले वऱ्हाडी भाविक म्हणून नांदेडच्या गुरुदागद्दीवर माथा टेकविण्यासाठी जात होते. मात्र काळ होऊन आलेल्या आयशर ट्रकने एका क्षणात सर्वांना गतप्राण केले. कोसदनी घाटाच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा अपघात होय.
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अहोरात्र वाहने धावत असतात. अपघाताच्या लहान-सहान घटना घडत असतात. शुक्रवारी पहाटे घडलेल्या या भीषण अपघाताने समाजमन सुन्न झाले. पंजाब आणि दिल्ली येथील काही परिवार नागपूर येथे लग्नासाठी आले होते. शीख समाज बांधवांचे अमृतसरनंतर सर्वात पवित्र ठिकाण म्हणजे नांदेडची गुरुदागद्दी होय. गुरुगोविंदसिंगांच्या चरणी माथा टेकविण्याची प्रत्येक शीख बांधवांची इच्छा असते. त्यामुळेच नागपूरला आलेला हा परिवार नांदेडला जाण्यासाठी उत्सुक होता. तीन तवेरा कार भाड्याने करून ही मंडळी गुरुवारी रात्री ११.३० वाजता निघाली. यात महिला, पुरुष आणि लहान मुले-मुलीही होत्या. मोठ्या उत्साहाने ही मंडळी नांदेडकडे निघाली होती. मार्गात आर्णी तालुक्याच्या लोणबेहळ येथे यापैकी दोन वाहनांनी चहा-पाणीही केले. एक तवेरा मात्र सुसाट वेगाने पुढे निघून गेली. जणू त्यांना काळच बोलावित होता. कोसदनी घाटातील पुलाजवळील वळणावर समोरुन आलेल्या पपई भरलेल्या ट्रकने धडक दिली. धडक एवढी जबर होती की, तवेराचा चुराडा होऊन ट्रकही उलटला. आर्त किंकाळ्यांनी संपूर्ण घाट हादरुन गेला. पहाटेची वेळ असल्याने मदतीसाठीही कुणी नव्हते. त्याच वेळी त्यांच्या सहकाऱ्यांच्या दोन तवेरा कार पोहोचल्या. अपघाताचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अनोळखी परिसर मदत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला. या अपघातात तीन महिला, पाच मुली आणि तीन पुरुष जागीच ठार झाले तर दोन मुली उपचारासाठी नेत असताना वाटेत गतप्राण झाल्या.
या अपघाताची माहिती मिळताच लोणबेहळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका घेऊन लोणबेहळचे तरुण पोहोचले. कारमध्ये अडकलेल्यांना अक्षरश: ओढून बाहेर काढावे लागले. ही मदत सुरु असतानाच महामार्ग पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले. आर्णीचे ठाणेदार रवींद्र भंडारे आपल्या ताफ्यासह तेथे गेले. त्यानंतर मदतीला वेग आला. वाहनातील सर्वांना प्रथम लोणबेहळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून तत्काळ आर्णीच्या रुग्णालयात आणले. परंतु तोपर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला होता. अनोळखी गावात पंजाब-दिल्लीचीही मंडळी भांबावली होती. मात्र आर्णीकरांनी त्यांना मदतीचा हात दिला. रुग्णालयात असलेल्या इतर दोन वाहनातील सर्व मंडळीसाठी चहा-पाणी आणि नास्त्याची सोय अंकुश राजूरकर, नीलेश बुटले, दिग्गविजय मुंडवाईक, दिवाशिष वानखडे, नाना मारबते, रुपेश मारबते यांनी केली. अपघातग्रस्तांना अनवर पठाण, नितेश बुटले, बाबाराव गावंडे, नीलेश आचमवार, प्रमोद राऊत, निखील मंगाम, खुशाल नागापुरे, जयराम मुनेश्वर, गुड्डू वानखडे यासह लोणबेहळ, कोसदनी आणि आर्णी येथील नागरिकांची मदतीचा हात दिला. काळजाला चर्रर करणाºया या अपघाताने माणुसकीचा प्रत्यय दिला. सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन करण्यात आले. तत्काळ मदत गोळा झाली. त्यांचे मृतदेह दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रश्न होता. परंतु तो प्रश्नही येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोडविला.
सोशल मीडियाच्या आवाहनाने मदतीचा ओघ
अपघाताचे वृत्त कळताच अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. आर्णी येथील अधिकारी-पदाधिकारी-पत्रकार नावाचा एक व्हॉसट्अ‍ॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरून मदतीसाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत काही वेळातच मदतीचा ओघ सुरू झाला. दुपारपर्यंत ५० हजार रुपयांची मदत गोळा झाली. अपघातग्रस्तांसाठी आर्णीकर देवदूत होऊन धावून आले.
नांदेड गुरुद्वारा ट्रस्टकडून शववाहिनीची व्यवस्था
कोसदनी घाटातील अपघातात ठार झालेल्या १२ पैकी नऊ जणांना दिल्ली, पंजाबमध्ये पोहोचविण्याचे आवाहन उभे ठाकले. शवविच्छेदन सुरू होते. त्याच वेळी आर्णीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेह त्यांच्या गावी पाठविण्याची तयारी चालविली. प्रहारचे प्रमोद कुदळे यांनी नांदेड येथील गुरुद्वारा ट्रस्टला या अपघाताची माहिती देऊन मदतीची विनंती केली. त्यांना प्रतिसाद देत तत्काळ तीन शववाहिनी आर्णी येथे पाठविण्यात आल्या. या वाहनातून त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळगावी पाठविले जाणार आहे.

Web Title: 12 killed in death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात