बारावी परीक्षा रद्द; आता पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 05:00 AM2021-06-06T05:00:00+5:302021-06-06T05:00:22+5:30
दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी बारावी परीक्षेतील गुण महत्वाचे मानले जातात. परंतु बारावीचीच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा कशा घेता येणार हा पेच निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावी पाठोपाठ लगेच बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना नाहक अन्याय सहन करावा लागणार आहे. तर काही जणांना आनंदही झाला आहे. मात्र बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेबाबत शासनाने अद्यापही धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी बारावी परीक्षेतील गुण महत्वाचे मानले जातात. परंतु बारावीचीच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा कशा घेता येणार हा पेच निर्माण झाला आहे. याशिवाय सरसकट होणाऱ्या मूल्यांकनात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यांची क्षमता ९०टक्के गुण मिळविण्याची आहे. त्यांना कदाचित ७५ टक्के गुणांवर समाधान मानावे लागेल. तर ज्यांची क्षमता सरासरी आहे, त्यांना कदाचित प्रावीण्य श्रेणी मिळण्याची भीती वर्तविली जात आहे. असे झाल्यास येत्या काळात समाजातील शैक्षणिक गुणवत्तेबाबतच गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याचीही भीती जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना अडचणी आल्यास अनेक घरांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिडचिड वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे निकष तातडीने जाहीर करावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
बारावीनंतरच्या संधी
कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी बारावीनंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असते.
फॅशन डिझायनिंग, नर्सिंग, पत्रकारिता, कायदा व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी बारावी परीक्षेचे गुण विचारात घेतले जातात.
बारावीतील यशानुसार पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन, अभियांत्रिकी, कृषी आदी विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी मिळते.
बारावीनंतर विद्यार्थ्यांना जेईई, नीट आदी परीक्षा देऊन अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी स्वत:ची पात्रता सिद्ध करता येते.
प्राचार्य, प्राध्यापक म्हणतात...
बारावीच्या भरवश्यावर विद्यार्थी उज्वल भविष्याचे स्वप्न पाहत असतात. बारावीवरच पुढचे जीवन अवलंबून असते. परीक्षा रद्द झाल्याने अडचणी येऊ शकता. या निर्णयामुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची राज्य सरकारने काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे. - प्रा. जितेंद्र जुनघरे
सध्या करिअरच्या दृष्टीने बारावीचा निकाल तेवढासा महत्वाचा राहिलेला नाही. पुढच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना तशाही प्रवेश परीक्षा घेतल्या जातातच. त्यात विद्यार्थी आपली पात्रता सिद्ध करू शकतात. मात्र अशा एन्टरन्स एक्झामसाठी काही अटी शासनाने शिथिल केल्या पाहिजेत. तरच सर्वांना न्याय मिळेल. - प्रा.डाॅ.रमजान विराणी
बारावीची परीक्षा रद्द झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेईई तसेच नीट परीक्षा द्यायची आहे, त्यांनी काय करावे ? हुशार विद्यार्थ्यांचे या निर्णयाने नुकसान केले आहे. पदवी प्रवेशासाठी अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.
- साक्षी किशोर बनारसे, प्राचार्य