१३० व्यापारी-अडत्यांना नोटीस जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2016 12:30 AM2016-07-27T00:30:42+5:302016-07-27T00:30:42+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीचा बंद १९ दिवसांपासून सुरू असून शेतकरी अडचणीत आले आहेत.
बाजारसमिती बंदचा १९ वा दिवस : परवाना रद्दची टांगती तलवार, शेतकरी अडचणीत
यवतमाळ : कृषी उत्पन्न बाजार समितीचा बंद १९ दिवसांपासून सुरू असून शेतकरी अडचणीत आले आहेत. व्यापारी आणि अडते आपल्या मुद्यावर ठाम असल्याने बाजार समितीने मंगळवारी १३० व्यापारी आणि अडत्यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे व्यापारी आणि अडत्यांचा परवाना रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने ५ जुलैला अडतमुक्त बाजार करण्याचा अद्यादेश जाहीर केला. तेव्हापासूनच बाजार समित्यांचा संप सुरू झाला. यवतमाळात ८ जुलैपासून या संपाची झळ शेतकऱ्यांना बसली. शेतमाल विकायचा कुठे, असा कठीण प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांकडून वसूल होणारी अडत रद्द करावी आणि ही अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, असा अध्यादेशात उल्लेख आहे. संप सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून १.७५ पैशाची अडत वसूल करण्यात येत होती.
अध्यादेशानंतरही अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या सूचना आहे. परंतु व्यापारी १.७५ पैशाऐवजी १ रूपये अडत अडत्यांना देण्यास तयार आहेत. व्यापाऱ्यांचा हा प्रस्ताव अडत्यांनी फेटाळला आहे. शेतकऱ्यांकडून जी अडत वसूल होत होती. तीच अडत व्यापाऱ्यांनी द्यावी, या मागणीवर अडतदार ठाम आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर बाजार समितीचा संप आजही सुरू राहीला आहे. यातून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच आहेत.
यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकांनी १६ जुलैला व्यापारी प्रतिनिधीची बैठक घेतली. बाजार समिती सुरू करण्याची विनंती त्यांनी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी १ टक्का अडत देण्याचा निर्णय घेतला. यावर अडत्यांनी १९ जुलैला बैठक घेऊन व्यापाऱ्यांच्या निर्णयाला विरोध केला. आता प्रशासकांनी व्यापारी आणि अडत्यांना नोटीस बजावली आहे. तत्काळ विषय निकाली काढून खरेदी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहे. यासंदर्भात व्यापारी अध्यक्ष आणि अडते अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतरही खरेदी सुरू न झाल्यास परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)
अडत्यांनी बोलावली तातडीची बैठक
राज्य शासनाच्या अध्यादेशात शेतकऱ्यांकडून अडत न घेण्याच्या सूचना आहेत. मात्र ही अडत किती असावी, याचा कुठलाही उल्लेख नाही. यामुळे शेतकऱ्यांकडून जी अडत वसूल करण्यात येत होती. तीच अडत व्यापाऱ्यांनी देणे अपेक्षित आहे. मात्र व्यापारी द्यायला तयार नाही. यामुळे अडत्यांनी संप कायम ठेवला आहे. मंगळवारी बाजार समितीने नोटीस बजावली आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी यासंदर्भात सर्वच अडत्यांची बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये एकमताने निर्णय झाल्यावर व्यापाऱ्यांसोबत बसून तोडगा काढला जाणार आहे, अशी माहिती अडत्यांचे अध्यक्ष गुणवंत पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.