१४ तालुक्यात काँग्रेसचे उमेदवार निश्चित
By admin | Published: January 26, 2017 12:59 AM2017-01-26T00:59:20+5:302017-01-26T00:59:20+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी १४ तालुक्यातील नावे निश्चित झाली आहे.
नेत्यांची मुंबईत बैठक : दोन तालुक्यात वाद कायम, २९ ला घोषणा, ३० ला एबी फॉर्म
यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी १४ तालुक्यातील नावे निश्चित झाली आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि प्रा. वसंत पुरके यांच्या मतदारसंघातील दोन तालुक्यात उमेदवारीचा वाद कायम आहे. दरम्यान या वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक झाली.
जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेस जिल्हा परिषदेच्या सर्व ६१ जागा आणि १६ पंचायत समित्यांची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. या गट आणि गणांसाठी काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आले. मात्र या अर्जांवरील अंतिम निर्णय मुंबईत २७ जानेवारी रोजी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. २९ जानेवारी रोजी उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार असून ३० तारखेला एबी फॉर्म वितरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
चर्चेच्या दोन फेऱ्या आटोपल्या
तत्पूर्वी मंगळवारी व बुधवारी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या बैठकीच्या दोन फेऱ्या मुंबईत पार पडल्या. या बैठकीला जिल्ह्याचे निरीक्षक श्याम उमाळकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार विजयराव खडसे, जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील आदींची उपस्थिती होती. या बैठकीतील चर्चेअंती जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत दारव्हा, आर्णी, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी, बाभूळगाव, कळंब, पांढरकवडा, आणि यवतमाळ या १४ तालुक्यांमध्ये फारसा वाद नसल्याचे निष्पन्न झाले. एका जागेसाठी अनेक अर्ज असले तरी वाद नसल्याने तेथे सक्षम उमेदवाराचे मेरिटवर नाव निश्चित करणे सोपे आहे.
घाटंजी-राळेगावात रस्सीखेच
घाटंजी व राळेगाव या दोन तालुक्यांमध्ये उमेदवारी कुणाला याचा वाद कायम आहे. त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)