गारपीटग्रस्तांना १४ कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:15 PM2018-03-07T23:15:22+5:302018-03-07T23:15:22+5:30
गत महिन्यात जिल्ह्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : गत महिन्यात जिल्ह्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला १४ कोटी तीन लाख ३१ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे.
गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यासाठी हा निधी ६ मार्चला प्राप्त झाला. हा निधी लगेच तालुक्यांना वितरित करण्यात आला. गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना या निधीचे वाटप तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहे.
जिल्ह्यात १२ आणि १३ फेब्रुवारीला गारपिटीने ११ हजार ९0 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यात आठ हजार ३२९ हेक्टवरील पिकांचे ३३ ते ५0 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. दोन हजार ७६१ हेक्टरवरील पिकांचे ५0 टक्केच्यावर नुकसान झाले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच तो शासनाकडे पाटविला. त्यानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून १४ कोटी तीन लाख ३१ हजार रूपये प्राप्त झाले.
या निधीचे तातडीने वाटप तातडीने करून तसा अहवाल सात दिवसांच्या आत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.
अशी आहे तालुकानिहाय मदत
यवतमाळ तालुक्याला एक कोटी ८३ लाख १९ हजार, कळंब १५ लाख ९७ हजार ५००, राळेगाव १७ लाख तीन हजार ७००, बाभूळगाव एक कोटी ४३ लाख ८१ हजार ५५, मारेगाव ६६ लाख ४४ हजार २२०, तर केळापूर तालुक्यातील शेतकºयांना २३ लाख ३९ हजार ७७५ रूपये मिळणार आहे. घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांना ६४ लाख ५१ हजार, आर्णी एक कोटी ३८ लाख पाच हजार, दारव्हा तीन कोटी ६९ लाख १८ हजार, नेर १२ लाख ८२ हजार, पुसद एक कोटी ९८ लाख ३४ हजार, उमरखेड एक कोटी तीन लाख १७ हजार आणि महागाव तालुक्यातील शेतकºयांना ७३ लाख ३५ हजार रूपयांची मदत मिळणार आहे.