बेंबळा वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १४ कोटी मंजूर
By Admin | Published: April 4, 2017 12:07 AM2017-04-04T00:07:40+5:302017-04-04T00:07:40+5:30
शहराला बेंबळा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याची योजना अमृत योजनेअंतर्गत प्रस्तावित केली आहे.
यवतमाळ नगरपरिषद: उन्हाळ्यात प्रत्येक प्रभागात लागणार दोन टँकर
यवतमाळ : शहराला बेंबळा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याची योजना अमृत योजनेअंतर्गत प्रस्तावित केली आहे. या योजनेवर १९६ कोटी ८६ लाख रुपये खर्च होणार आहे. त्यातील २५ टक्के वाटा हा नगरपरिषदेला उचलावा लागणार आहे. यातील पहिला टप्पा म्हणून नगरपरिषदेने १३ कोटी ७८ लाख रुपये देण्याचे मंजूर केले. सोमवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सभेत हा ठराव घेण्यात आला.
यवतमाळ शहराचा वाढलेला विस्तार पाहता शाश्वत पाणीपुरवठा योजना असणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून बेंबळा प्रकल्पातील पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या प्रकल्पामध्ये ३० टक्के पाणीसाठा यवतमाळकरांसाठी आरक्षित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया केली असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी पी.एल. आकडे यांनी निविदा भरली आहे. या निविदेप्रमाणे २५ टक्के वाटा नगरपरिषदेला द्यायचा आहे. त्यासाठी पालिकेला अतिरिक्त खर्चाचा बोझा उचलावा लागत आहे.
या खर्चाला मंजुरी देण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली होती. नगरपरिषदेने हा ठराव एकमताने मंजूर केला. यावेळी काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी नगरपरिषदेची आर्थिक स्थिती खरोखरच ही रक्कम देण्याइतकी सक्षम आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र पाण्याचा मुद्दा जिव्हाळ्याचा असल्याने त्यावर इतर सदस्यांनी आक्षेप घेऊन ठराव मंजूर करून घेतला. तसेच उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रत्येक प्रभागामध्ये दोन पाण्याचे टँकर लावण्याचा निर्णय झाला. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही सभागृहाने मुख्याधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय आणि सर्व समितीचे सभापती, मुख्याधिकारी सुदाम धुपे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)