१४ गावांचा प्रशासनाविरुद्ध एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:25 AM2018-01-02T00:25:33+5:302018-01-02T00:26:07+5:30
पैनगंगा अभयारण्यात राहणारे नागरिक स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
आॅनलाईन लोकमत
उमरखेड : पैनगंगा अभयारण्यात राहणारे नागरिक स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आतापर्यंत प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने दिली. परंतु समस्या सुटल्या नाही. आता अभयारण्यातील १४ गावातील नागरिकांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यातील बंदीभागात १४ गावांना कोणत्याही सुविधा मिळत नाही. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहे. त्यात बिटरगाव, पिंपळगाव, गणेशवाडी, जेवली, मुरली, सोनदाभी, मथूरानगर, मोरचंडी, एकंबा, जवराळा, परोटी, गाडी, बोरी, खरबी, दराटी, चिखली या गावांचा समावेश आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. यासाठी वारंवार आंदोलने करण्यात आली. परंतु उपयोग झाला नाही. आता आरपारची लढाई लढण्यासाठी जेवली येथे सत्याग्रही परशराम पिलवंड यांच्या स्मारकावर २९ डिसेंबर रोजी १४ गावातील नागरिक एकत्र आले. याभागातील समस्या सोडविण्यासाठी जनआंदोलन करण्यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर पांढरे, प्रकाश पेंदे, जीवन फोपसे, गजानन कोल्हे, डॉ.भगवान देवसरकर, मारोती पिलवंड, जीवन कदम, प्रमोद राठोड, हनुमंत पिलवंड, संतोष खुपसे, उत्तम पांडे, श्रावण गायकवाड, राजू देवसरकर, रवी कलाले, धम्मपाल इंगोले आदी उपस्थित होते. आता समस्या सोडविण्यासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
प्रशासनाचे कायम दुर्लक्ष
पैनगंगा अभयारण्यात राहणाऱ्या १४ गावातील नागरिकांना मुलभूत सुविधाही मिळत नाही. रस्ते अभयारण्याच्या जाचक अटीत रखडले आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी आदी सुविधा मिळत नाही. याभागातील आदिवासी वनउपजावर आपला चरितार्थ चालवित होते. परंतु आता त्यावरही निर्बंध आणले आहे. डिंक, चारोळी, मोहफूल, बांबू, तेंदुपत्ता यावर स्वामित्व मिळविण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून सुरु आहे.