१४ लाखांचा साखर घोटाळा उघडकीस
By Admin | Published: February 25, 2015 02:16 AM2015-02-25T02:16:51+5:302015-02-25T02:16:51+5:30
रास्त भाव धान्य दुकानदारांना पुरवठा करण्यात येणारी ७०५ क्ंिवटल साखर शूगर नॉमिनींनी परस्पर विकून शासनाला १४ लाख रुपयांचा गंडा घातला.
उमरखेड : रास्त भाव धान्य दुकानदारांना पुरवठा करण्यात येणारी ७०५ क्ंिवटल साखर शूगर नॉमिनींनी परस्पर विकून शासनाला १४ लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार उमरखेड येथे सोमवारी उघडकीस आला असून या प्रकरणी निवृत्त तहसीलदार आणि शूगर नॉमिनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निवृत्त तहसीलदार सुरेश चिंतामण थोरात रा. अकोला आणि शुगर नॉमिनी शैलेश दिलीप सुरोशे रा. महागाव असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. उमरखेड तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांना पाच महिन्याचा साखरेचा कोटा न देता त्याची परस्पर विक्री केल्याची कुणकुण यापूर्वीच होती. मात्र या प्रकरणी तहसील प्रशासनाने गांभीर्याने लक्षच दिले नाही. जून ते डिसेंबर २०१४ या काळात सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करीत हा घोटाळा केल्याची माहिती आहे. तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यातर्फे पुरवठा निरीक्षक रवींद्र येन्नावार यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
त्यावरून शैलेश सुरोशे व सुरेश थोरात यांच्याविरोधात भादंविच्या विविध कलमान्वये आणि जीवनाश्यक वस्तू कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अधिक तपास ठाणेदार शिवाजी बचाटे करीत आहे. (प्रतिनिधी)