जिल्ह्यात स्क्रब टायफसचे १४ रुग्ण, एकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:15 PM2018-09-08T22:15:48+5:302018-09-08T22:16:15+5:30

विदर्भात स्क्रब टायफस आजाराचा विळखा वाढत असताना जिल्ह्यातही त्याची लागण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यात लगतच्या वाशीममधील दोन रुग्णांचा समावेश आहे.

14 people of the scrab typhus, one of the victims of the district | जिल्ह्यात स्क्रब टायफसचे १४ रुग्ण, एकाचा बळी

जिल्ह्यात स्क्रब टायफसचे १४ रुग्ण, एकाचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देशेजारी जिल्ह्यातील रुग्णांची धाव : वाशीम डीएचओला अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदर्भात स्क्रब टायफस आजाराचा विळखा वाढत असताना जिल्ह्यातही त्याची लागण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यात लगतच्या वाशीममधील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यावरून वाशीमच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक खबरदारीसाठी यवतमाळातून अलर्ट देण्यात आला आहे. वणी तालुक्यात स्क्रब टायफसने एकाचा अलिकडेच बळी गेला आहे.
गेल्या महिनाभरापासून राज्यात स्क्रब टायफस आजार वाढत आहे. विदर्भात आतापर्यंत या आजाराने १२ जणांचे बळी गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सजग राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकंदर १४ रुग्णांना स्क्रब टायफस झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील १२ रुग्ण हे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्यातील २ शहरी भागातील तर १० जण ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. शिवाय, वाशीम जिल्ह्यातील दोन रुग्ण सध्या यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल झाले आहेत. तर परजिल्ह्यातील ३-४ रुग्ण यापूर्वीच यवतमाळात बरे होऊन परतले आहेत. दरम्यान गुंज (ता. महागाव) येथील महिलेला स्क्रब टायफस झाल्याने यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल केले.
या आजारात सुरवातीला ताप येतो. असे रुग्ण ग्रामीण आरोग्य केंद्रात आल्यावर त्यांच्या रक्ताची शिरॉलॉजिक टेस्ट झाल्याशिवाय स्क्रब टायफसचे निदान होऊ शकत नाही. ही रक्त चाचणी केवळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जात आहे. तर वाशीमसारख्या जिल्ह्यातूनही काही रुग्ण आले आहेत. त्यामुळे यवतमाळ मेडिकलने वाशीमच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने पत्र पाठवून दक्षता घेण्याबाबत सजग केले आहे. या पत्राचा हवाला देत वाशीम डीएचओंनी साथरोग नियंत्रणासाठी पथके तयार केली आहेत.

घरगुती उपचार
दूधात हळद टाकून प्यावे. मेथीची पाने पाण्यात भिजवून गाळून पाणी प्यावे. मेथी पावडरही पाण्यात टाकून घेता येते. या उपचारांनी ताप नियंत्रित करता येतो. तसेच शरीराच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

डॉक्टर म्हणतात, घाबरू नये
स्क्रब टायफस बरा होऊ शकतो. त्याला घाबरण्याचे कारण नाही. त्यासाठी आवश्यक असलेली डॉक्सीसायक्लीन ही गोळीही सहज उपलब्ध असून स्वस्तही आहे, अशी दिलासादायक माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण आणि मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी दिली.

स्क्रब टायफस म्हणजे नेमके काय ?
साधारणत: पाण्याचा साठा असलेल्या जागी वाढणाºया ‘ओरिएंटा सुसुगामुशी’ नामक ‘माईटस’च्या (किड्याच्या) चावण्यामुळे हा आजार होतो. पावसाळी वातावरणात जंगल, शेत आणि दाट गवताच्या ठिकाणी हे किडे वाढतात. किडा चावल्यावर त्याच्या लाळेतील ‘रिक्टशिया सुसुगामुशी’ हा घातक जंतू मानवी रक्तात पसरतो. त्यामुळे यकृत, मेंदू आणि फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. विशिष्ट प्रकारच्या रक्त तपासणीतूनच या आजाराचे निदान होऊ शकते. या आजाराचा उपचार अँटी रिकेटशिअल औषधांनी केला जातो. डॉक्सीसायक्लीन टॅबलेट दिल्या जातात. या आजाराबाबत योग्य माहिती घेऊनच उपचार करावा, असे आवाहन केले गेले.

ही आहेत आजाराची लक्षणे
किडा चावलेल्या ठिकाणी काळा डाग पडतो.
रुग्णाला प्रचंड ताप येतो.
शरिरात कमजोरी वाढते.
मांसपेशींमध्ये वेदना होतात.
भूक कमी होते, पोट बिघडते.
गंभीर अवस्थेत प्लेटलेट्सची संख्याही घटते.


अशी घ्यावी दक्षता
घराच्या आजूबाजूला झुडूपे वाढू न देणे.
दाट गवतात जाऊ नये, गेल्यास बुट, ग्लोव्हज घालावे.
शेतात काम करताना पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावे.
घराच्या परिसरात डबके साचू देऊ नये.
डीडीटी सारख्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
- २-३ दिवस सतत ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: 14 people of the scrab typhus, one of the victims of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य