जिल्ह्याचा १४०० मेट्रिक टन युरिया पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:11+5:30

यवतमाळ जिल्ह्याला हक्काचा रॅक पॉईंट मिळवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. हा रॅक पॉईंट नसल्याने जिल्ह्याला शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून रहावे लागते. रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्याच्या नावाने आलेला माल अर्धाअधिक परस्परच वळविला जातो. युरियाबाबत अलिकडेच दोन रॅक पॉईंटवर हा प्रकार घडला.

1400 metric tons of urea seized from the district | जिल्ह्याचा १४०० मेट्रिक टन युरिया पळविला

जिल्ह्याचा १४०० मेट्रिक टन युरिया पळविला

Next
ठळक मुद्देधामणगाव रेल्वे व नांदेड रॅक पॉर्इंट : दोन्ही जिल्ह्यातील राजकीय दबाव ठरला वरचढ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह््यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा असताना यवतमाळ जिल्ह्याच्या हक्काचा युरिया रॅक पॉईंटवरून परस्परच पळविला जात आहे. त्यासाठी राजकीय दांडगाई केली जात आहे. नुकताच धामणगाव रेल्वे व नांदेडच्या रॅकपॉईंटवरून यवतमाळच्या हक्काचा अनुक्रमे १२०० व २०० मेट्रिक टन युरिया पळविला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
यवतमाळ जिल्ह्याला हक्काचा रॅक पॉईंट मिळवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. हा रॅक पॉईंटनसल्याने जिल्ह्याला शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून रहावे लागते. रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्याच्या नावाने आलेला माल अर्धाअधिक परस्परच वळविला जातो. युरियाबाबत अलिकडेच दोन रॅक पॉईंटवर हा प्रकार घडला. अमरावती व नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी आपले वजन वापरुन यवतमाळ जिल्ह्याच्या युरियामध्ये आपला हक्क सांगून तो पळविला. ते पाहता अमरावती व नांदेडचे राजकीय नेते यवतमाळच्या नेत्यांवर भारी पडल्याचे दिसते. खुलेआम युरिया पळविला गेला असताना कृषी विभाग मात्र असे काही घडलेच नसल्याचे सांगत आहे. राजकीय नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे शेजारील जिल्हे यवतमाळवर वरचढ ठरत आहेत.
जिल्ह्यासाठी धामणगाव रॅकपॉईंटवर २४०० मेट्रिकटन युरिया आला होता. यातील १२०० मेट्रिक टन युरिया अमरावती जिल्ह्याने वळता केला. नांदेडच्या रॅकपॉईंटवर यवतमाळसाठी ३०० मेट्रिक टन युरिया पाठविण्यात आला होता. यातील केवळ १०० मेट्रिक टन युरियाच जिल्ह्याला मिळाला असून उर्वरित २०० मेट्रिक टन युरिया नांदेड जिल्ह्याने पळविला आहे.
राजकीय नेते मंडळी विकासाच्या मुद्यांवर किंवा शासनाकडून अधिकाधिक निधी खेचून आणण्यासाठी रस्सीखेच करीत असल्याचे पाहिले गेले. परंतु युरियावर पहिल्यांदाच रस्सीखेच होत आहे. यावरून टंचाईची तीव्रता लक्षात येते.

जिल्ह्यात प्रथमच विविध जिल्ह्यांच्या रॅकपॉईंटवरून खत येत आहे. ही रॅक अलोकेशननुसारच मिळत आहे. जिल्ह्याचा कोटा पळविला नाही. जिल्ह्याला संपूर्ण खत मिळाले आहे. आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. आता नव्याने खत मिळणार आहे. इतर ठिकाणी लॉकडाऊन असल्याने शेतकरी गर्दी करीत आहे. प्रत्येकाला युरिया मिळेल.
- राजेंद्र घोंगडे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ

पाऊस आला धावून शेतकऱ्यांच्या मदतीला
युरियामध्ये नायट्रोजन आहे आणि हवेतही नायट्रोजन आहे. पाण्याचा हवेशी संयोग होऊन नायट्रोजन जमिनीतील पिकांना आपोआप उपलब्ध होते. यामुळे युरियाची नैसर्गिक प्रक्रिया घडून पीक वाढते. जिल्ह्यात सतत पाऊस बरसत आहे. यातून पीक जोमाने वाढण्याची प्रक्रिया घडणार आहे.

Web Title: 1400 metric tons of urea seized from the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.